🔸नगराध्यक्षा विरोधात अविश्वास ठरावा संदर्भी जिल्हाधिकाऱ्यांकडे विशेष सभेची मागणी
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव (दि.10 फेब्रुवारी) :-
महागांव न.प.च्या राजकारणात मोठ्या घडामोडी नंतर राजकीय खळबळ उडाली असून नगरपंचायतीच्या विद्यमान नगराध्यक्षांच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसल्याचा ठपका ठेवत विविध पक्षांतील नगरसेवकांनी एकत्र येत त्यांच्या विरोधात अविश्वास ठराव आणण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांना अधिकृत निवेदन सादर करून अविश्वास ठराव पारित करण्या संदर्भी विशेष सभा बोलाविण्याची मागणी करण्यात आली.
महागाव न.प.च्या नगरसेवकांनी सादर केलेल्या निवेदनात नमूद केले, महागांव नगरपंचायतीच्या अध्यक्षांचा कारभार एकाधिकारशाही स्वरूपाचा असून लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता निर्णय घेतले जात आहेत. विकासकामां मध्ये पारदर्शकतेचा अभाव,नगरसेवकांच्या सूचनांकडे जाणीव पूर्वक दुर्लक्ष,तसेच प्रशासकीय प्रक्रियेत मनमानी हस्तक्षेप होत असल्याने
अध्यक्षांच्या कार्यपद्धती मुळे नगरपंचायतीतील लोकशाही मूल्यांना तडा जात आहे. आम्हा नगरसेवकांचा नैतिक अधिकार शिल्लक राहिलेला नाही असे स्पष्ट मत निवेदनात मांडण्यात आले.त्या मुळे नगरपंचायतीचा कारभार सुरळीत चालावा आणि जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय व्हावेत, या साठी अध्यक्षां विरोधात अविश्वास ठराव आणणे अपरिहार्य झाल्याचे नगरसेवकांचे म्हणणे आहे.
नगरसेवकांनी महाराष्ट्र नगरपंचायत अधिनियमा तील तरतुदीनुसार आवश्यक असलेल्या संख्याबळासह विशेष सभा बोलाविण्याची 10 फेब्रुवारी रोजी दिलेल्या निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली. नियमाप्रमाणे आवश्यक सदस्यांची संख्या पूर्ण झालेली असून,प्रशासनाने तातडीने विशेष सभा घेऊन अविश्वास ठरावावर निर्णय घ्यावा,अशी आग्रही मागणी करण्यात आली.
या निवेदनावर नगरसेवक रामराव नरवाडे,प्रमोद भरवाडे, गजानन साबळे, विशाल पांडे, मो. परवेज मो. शफी सुरैया, सुरेश नरवाडे, सौ. जयश्री नरवाडे, श्रीमती जयश्री इंगोले, सौ. आशा बावणे,सौ.करूणा शिरबिरे,सौ. सुनिता डाखोरे, सौ. रंजना आडे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, या घडामोडींमुळे महागांव नगरपंचायतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून काँग्रेसच्या अध्यक्ष यांच्यावर अविश्वास दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
महागाव नगरपंचायतीच्या कार्यकाळाला काहीच महिने शिल्लक असतांना काँग्रेसची सत्ता उलथून टाकून भाजपाच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय सुरू करण्याचे नियोजन उमरखेड दरबारात आखल्याचे बोलले जात आहे. वादग्रस्त देशी दारूचे दुकानाला टाळे, गावात सकारात्मक संदेश आणि पुढील पाच वर्षाची सत्ता काबीज करण्याचा मास्टर प्लॅन तयार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान काँग्रेसची सत्ता वाचवण्यासाठी गटनेते शैलेश कोपरकर यांनी प्रयत्न चालवले असले तरी यावेळी त्यांचे सर्व प्रयत्न सपशेल फेल ठरतील असा अंदाज राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत.







