✒️ महेंद्र लटारे गडचिरोली (Gadachiroli जिल्हा प्रतिनिधी)
गडचिरोली(दि .15 जानेवारी) :- नगरपालिकेच्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपने एक महत्त्वाचा व दूरगामी परिणाम करणारा निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपने १५ नगरसेवक निवडून आणत नगराध्यक्ष पदावर आपला दावा मजबूत केला असून, आता उपाध्यक्ष पदाची धुरा सर्वात युवा नगरसेवक निखिल चरडे यांच्या हाती सोपवण्यात आली आहे.
अतिशय कमी वयात राजकारणात प्रवेश करून जनतेचा विश्वास संपादन करणाऱ्या निखिल चरडे यांनी आपल्या कार्यकौशल्याने व जनसंपर्काने पक्ष नेतृत्वाचे लक्ष वेधून घेतले होते. त्यांच्या निवडीमुळे युवकांना प्रोत्साहन देण्याचा भाजपचा स्पष्ट संदेश नगरपालिकेच्या माध्यमातून दिला गेला आहे.
उपाध्यक्षपदाच्या निवडीनंतर नगरपालिकेच्या सभागृहात कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते, नगराध्यक्ष, नगरसेवक तसेच पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. अनेकांनी निखिल चरडे यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
निखिल चरडे यांनी आपल्या मनोगतात “ही जबाबदारी म्हणजे सन्मानासोबतच मोठी जबाबदारी आहे. गडचिरोली शहराच्या विकासासाठी, मूलभूत सुविधा मजबूत करण्यासाठी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करणार,” असा विश्वास व्यक्त केला.
त्यांच्या निवडीमुळे गडचिरोलीच्या राजकारणात युवक नेतृत्वाला नवे बळ मिळाले असून, आगामी काळात नगरपालिकेच्या विकासकामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







