✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.25 डिसेंबर) :-
महागाव तालुक्यातील ग्राहकांनी आपल्या हक्कांप्रती जागरूक राहणे ही काळाची गरज आहे. कोणत्याही वस्तूची खरेदी करतांना पक्के बिल मागणे हा ग्राहकाचा अधिकार आहे. ग्राहकाची फसवणूक झाल्यास तक्रार करण्यासाठी पुढे यावे असे आवाहन परविक्षाधीन नायब तहसीलदार रोहित शिंदे यांनी आयोजित ग्राहक दिन कार्यक्रमातून केले.
24 डिसेंबर 1986 रोजी भारतात ग्राहक संरक्षण कायदा संमत झाला. त्या निमित्ताने महागाव तहसील कार्यालयात राष्ट्रीय ग्राहक दिनाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थाना वरून प्रविक्षाधीन नायब तहसीलदार रोहित शिंदे यांनी ग्राहकांना मार्गदर्शन करून जागृत केले.
शेतकऱ्यांनी बियाणांच्या खरेदीत सतर्कता बाळगली पाहिजे
या वेळी तालुका कृषी अधिकारी टकले यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतांना सांगितले की, शेतीसाठी बियाणे खरेदी करतांना ग्राहकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे. बियाण्याची पिशवी आणि त्याचे पक्के बिल घेतल्या शिवाय खरेदी पूर्ण करू नये. बिलावर संबंधित दुकानदाराची सही आणि शिक्का असणे अत्यंत महत्त्वाचे आहे,जेणे करून फसवणूक झाल्यास कायदेशीर कार्यवाही करता येईल.
गॅस पुरवठा आणि अवैध वापरावर कार्यवाही
कार्यक्रमात गॅस एजन्सीचे प्रतिनिधी रवी वाघमारे यांनी गॅस पुरवठ्याबाबत माहिती दिली. गुजरात वरून गॅस लिक्विड येण्यास विलंब झाल्यामुळे पुरवठ्यात काही अडचणी येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महागाव तहसीलचे पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे यांनी सांगितले की, हॉटेल, ढाबा, इतर आस्थापनेवर घरगुती वापराच्या सिलेंडरचा अवैधरित्या वापर होत असल्याचे आढळून आल्याने अनेकांवर कडक कार्यवाही करण्यात आली आहे. धान्य वितरणासंबंधी आलेल्या तक्रारीचे तात्काळ निवारण करण्यात येत असून अशा प्रकारे आपण दोषी रेशन दुकानदारांवर सुद्धा कार्यवाही केल्या आहेत. यापुढेही करण्यात येईल. रेशन संदर्भातअवैध व्यापार करणाऱ्या वर निश्चितच कडक कार्यवाही करण्यात येणार असल्याचे मोहन कोल्हे यांनी नमूद केले.
विनामूल्य कायदेशीर मदत
आनंद वाघमारे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले 2019 मध्ये ग्राहक संरक्षण कायद्यात महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या आहेत. ग्राहकांची फसवणूक झाली असल्यास ‘ग्राहक पंचायत’च्या वतीने विनामूल्य मार्गदर्शन व मदत केली जाते. जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी या परिषदेचे अध्यक्ष तर जिल्हा पुरवठा अधिकारी सचिव असतात. ग्राहकांनी घाबरून न जाता तक्रार करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे त्यांनी यावेळी आव्हान केले.या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी परिविक्षाधीन तहसीलदार रोहित शिंदे, मार्गदर्शक म्हणून आनंद वाघमारे, केशव चटुले, कनवाळे, अनिल विरखडे,भावना तायडे उपस्थित होते. तसेच लक्ष्मण दमकोंडावार,रवी वाघमारे,ॲड. अविनाश वजीराबादे, पुरवठा निरीक्षण अधिकारी मोहन कोल्हे, गोदाम व्यवस्थापक रामा बनसोडे, राशन कार्ड लिपिक लखन चव्हाण, परमिट लिपिक ए. एस. कनवाळे, रमेश अकोस्कर तसेच रास्त भाव धान्य दुकानदार आणि परिसरातील अनेक ग्राहक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







