🔸उपविभागीय अधिकाऱ्यांनी दिले कार्यवाहीचे निर्देश
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.17 डिसेंबर) :-
अवैधरीत्या गौण खनिज (माती) तस्करी करणारे सवना येथील ट्रॅक्टर जप्त करून तहसील कार्यालयात लावण्यात आले होते. चोरटी वाहतूक करणाऱ्या चार व्यक्तीद्वारे ट्रॅक्टर तहसील कार्यालया मधून बेकायदा रीत्या पळून नेल्या मुळे गुन्हा दाखल करण्यासाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांनी 17 डिसेंबर रोजी तशा प्रकारचे निर्देश दिले आहेत.
मंगळवारी सवना येथील गौणखनिज तस्कराद्वारे माती उत्खनन करून अवैधरित्या चोरटी वाहतूक करतांना आढळल्याने महसूल प्रशासनाच्या वतीने कार्यवाहीसाठी वाहन जप्त करण्यात आले. जप्त करण्यात आलेले वाहन तहसील कार्यालया मधून पळवून नेल्याने महसूल विभागाने महागाव पोलिसांत बुधवारी तस्करावर गुन्हे दाखल होण्यासाठी तक्रार दाखल केली.
16 डिसेंबर रोजी अवैधरीत्या एक ब्रास माती गौण खनिज (माती) उत्खनन करून चोरट्या पद्धतीने बिना नंबर सोनालिका कंपनीचे डीआय 775 या मॉडेलचे ट्रॅक्टर कार्यवाही करण्यासाठी तहसील कार्यालय महागाव येथे जप्त करण्यात आले होते. दंडात्मक कार्यवाही साठी लावण्यात आलेले सदरचे ट्रॅक्टर मालक दिलीप सदाशिव येरवळ, योगेश सदाशिव येरवळ, अनिकेत येरवाळ, पिंटू कटारे सर्व रा.सवना ता. महागाव व इतर अनोळखी व्यक्तीने मंगळवारी संध्याकाळी 6 वा.चे दरम्यान तहसील कार्यालय महागाव येथुन जप्त करण्यात आलेले ट्रॅक्टर बेकायदेशीर रित्या पळवून नेले. निळ्या रंगाचा ट्रॅक्टर विना नंबर प्लेट सोनालिका कंपनीचा डीआय 775 या मॉडेलचा आहे. त्या वरती उजव्या व डाव्या दोन्ही बाजूला योगेश येरवळ लिहून आहे. सदर ट्रॅक्टरच्या ट्रॉलीवर 9022872013 हा मोबाईल नंबर लिहून आहे. ट्रॅक्टरची ट्रॉली ही निळ्या रंगाची विना नंबरची असून त्या ट्रालीवरती मालवाहक ग्रीनपारस असे लिहिले आहे. सदरची माहिती उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांच्या निर्देशा नुसार संबंधित महसूल कर्मचाऱ्यांनी महागाव पोलीस स्टेशन येथे फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, या करिता तक्रार दाखल केली. तक्रारीत म्हटले, वरील सर्व व्यक्तींनी वाहन तहसील कार्यालय येथून बेकायदेशीर रित्या संघटित गुन्हा करून पळविला आहे. त्यांनी महसूल दंडात्मक कार्यवाहीत शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे. शासनाच्या ताब्यात असणाऱ्या वाहनाची त्यांनी संघटितरीत्या नियोजन करून चोरी केली आहे. तसेच त्यांनी सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था बिघडविली आहे, त्यामुळे संबंधिता विरुद्ध वरील बाबी नुसार सीआरपीसी व आयपीसीच्या विविध कलमा नुसार गुन्हा दाखल करून पळवून नेलेले ट्रॅक्टर तहसीलच्या ताब्यात देण्यात यावे, जेणे करून संबंधितांवर दंडात्मक कार्यवाही करता येईल. ट्रॅक्टरचा पुढील तपास महागाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धनराज निळे यांच्या मार्गदर्शनात देवानंद कायंदे (सब इन्स्पेक्टर) हे करीत आहे.







