🔸माहूर गडावरील श्री दत्त शिखर संस्थांनवर दि चार रोजी साजरा होणार श्री दत्त जयंती महामहोत्सव
✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.2 डिसेंबर) :-
दि 4 रोजी श्री दत्त शिखर संस्थान वर साजरा होणाऱ्या श्री दत्त जन्म सोहळ्या निमित्त माहूरगडावर सुरू झालेल्या धार्मिक उत्सवाची भक्तीमय ध्वनि निनादत असून. दत्तशिखर मंदिर परिसरात दत्त महाराजांच्या पालखी सोहळ्यास अत्यंत श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दि ३० नोव्हेंबर २०२५ पासून या मंगलमय पालखी उत्सवाचा प्रारंभ करण्यात आला आहे. शनिवार रविवार च्या पालखी सोहळ्यास हजारो भाविक भक्तांनी मोठ्या भक्ती भावात उपस्थित राहून पालखी सोहळ्याचा आनंद घेतला.
उत्सवाच्या पहिल्या दिवशी दत्तशिखरचे परमपूज्य श्री श्री श्री १०८ महंत मधुसूदन भारती महाराज यांच्या शुभहस्ते भगवान श्री दत्त प्रभूंच्या पहिल्या पालखीची विधिवत पूजा, अभिषेक आणि मंत्रोच्चारात महापूजन करण्यात आले. पूजनानंतर पालखीचे मंदिर परिसरात भव्य मिरवणुकीने दर्शन घडविण्यात आले. पालखी मंदिर प्रदक्षिणा करीत परत मंदिरात येऊन आरतीने सोहळ्याची सांगता झाली.
या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण ठरलेले साधू-संतांची शिष्यांची उपस्थिती, सुशोभित घोडे, भालेधारक, चोपदार, मशालधारक, वाद्यवृंद तसेच गडावरील सेवेकरी यांची निष्ठेने केलेली सेवा यामुळे वातावरण अधिक मंगलमय झाले. पालखीच्या मार्गावर “जय दत्त दिगंबरा”च्या घोषणांनी गड दुमदुमून निघाला.माहूरगडाच्या पौराणिक महत्त्वामुळे देशाच्या विविध भागातून आलेले भाविक दत्त महाराजांच्या दर्शनासाठी तसेच या दिव्य पालखी सोहळ्याचे दर्शन करण्यासाठी मोठ्या संख्येने येऊ लागले आहेत. दूरदूरच्या गावांतून येणारे भक्त पालखीचे रथ, सजविलेली देवप्रतिमा आणि परंपरेचे दर्शन घेताना भारावून जात असल्याचे दृश्य अनुभवास येत आहे.
प्रत्येक वर्षीप्रमाणे यंदाही ही दैदिप्यमान पालखी पाच दिवस दत्तशिखर मंदिर परिसरात काढण्यात येणार असून, दिवसेंदिवस भक्तांची उपस्थिती वाढत आहे. उत्सवादरम्यान दत्त भक्तांसाठी विविध धार्मिक कार्यक्रम, आरत्या, भजन-कीर्तन आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याने संपूर्ण गड भक्तिरसात न्हाऊन निघत आहे. दत्त जयंती उत्सवातील हा पालखी सोहळा माहूरगडाच्या परंपरेचा अविभाज्य भाग ठरत असून, दत्त भक्तांसाठी तो वर्षातून एकदा अनुभवता येणारा अविस्मरणीय भक्तिमय सोहळा ठरतो आहे.







