हिंदी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ विनोदी अभिनेते गोवर्धन असरानी यांचे सोमवारी, २० ऑक्टोबर २०२५ रोजी वयाच्या ८४ व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली. अभिनेते असरानी यांचा जन्म १ जानेवारी १९४१ रोजी जयपूर (राजस्थान) येथे झाला.
मूळ सिंधी कुटुंबातील असरानी यांनी शिक्षणानंतर FTII, पुणे येथून अभिनयाचं प्रशिक्षण घेतलं आणि मुंबई गाठली. १९६७ मध्ये ‘हरे कांच की चूडियाँ’ या चित्रपटातून त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. पण त्यांना खरी ओळख मिळवून दिली ती ‘शोले’ मधील त्यांनी साकारलेल्या हास्यास्पद जेलरच्या भूमिकेने. या चित्रपटातील “हम अंग्रेजों के जमाने के जेलर है…..” हा त्यांचा संवाद आजही प्रेक्षकांना स्मित हास्य देतो. ‘बावर्ची’, ‘छोटी बहू’, ‘चुपके चुपके’, ‘अभिमान’ या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही गाजल्या. राजेश खन्ना, अमिताभ बच्चन, धर्मेंद्र, ऋषी कपूर यांसारख्या अनेक दिग्गजांसोबत त्यांनी काम केलं. त्यांच्या प्रत्येक भूमिकेत वेगळेपणा आणि समयसुचक विनोद जाणवत असे.
अलीकडे आलेल्या ‘हेरा फेरी’, ‘गरम मसाला’, ‘भूल भुलैया’ सारख्या चित्रपटांमधून नव्या पिढीलाही ते हसवून गेले. त्यांच्या विनोदी भूमिकांच्या पाठीमागे प्रचंड मेहनत, वेळेचं अचूक भान आणि अभिनयातली सहजता हे त्यांचं गुपित होतं. खासगी जीवनात अत्यंत साधे, विनम्र आणि हसतमुख असणारे असरानी सर्वांच्या मनात कायम घर करून राहिले. असरानी यांनी विनोदातला दर्जा उंचावला आणि “कॉमेडी”ला सन्मान मिळवून दिला. अभिनेते असरानी जरी आपल्यातून निघून गेले असले तरी त्यांचं हसू, त्यांचा आवाज आणि त्यांचा अभिनय प्रेक्षकांच्या मनात कायम राहील. ज्येष्ठ विनोदी अभिनेते असरानी यांना भावपूर्ण श्रद्धांजली!
✒️श्याम ठाणेदार दौंड जिल्हा पुणे
९९२२५४६२९५







