🔹वाकोडी गावात सिमेंट रोडची दुरुस्ती न करताच खोट्या स्वाक्षरीचे एमबी सादर प्रकरण आता उघड होणार
🔸महागाव पंचायत समिती मधून बोगस स्वाक्षऱ्या केलेल्या एमबीचे रेकॉर्ड लंपास झाल्याचा अँड. अमजद पठाण यांची तक्रार
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.14 ऑक्टोबर) :-
महागाव तालुक्यातील वाकोडी ग्रामपंचायत येथील रोजगार सेवक (डमी ठेकेदार) आणि सरपंचानी संगणमत करून गावातील सिमेंट रस्त्याचे काम न करता बोगस एम.बी. रेकॉर्ड महागाव पंचायत समितीला 7 ऑक्टोबर रोजी सादर केला आहे. शासनाची दिशाभूल करून सरपंच आणि रोजगार सेवकांनी संगणमत करून 15 व्या वित्त आयोगाच्या रकमेवरती डल्ला मारण्याचा मनसुबा चाणाक्ष बुद्धीच्या अमजदखान पठाण यांनी हाणून पाडला. आता या प्रकरणासाठी सत्यता पडताळणी करिता वाकोडी गावात बुधवारी चौकशी पथक धडकणार आहे.
बनावट प्रकरण चांगलेच अंगलट येणार हे लक्षात आल्याने 9 ऑक्टोबर गुरुवारी गटविकास अधिकारी कार्यालयातील खोटे एमबी डॉक्युमेंट्स ज्यावर एकाच पेनद्वारे अधिकाऱ्यांच्या बनावट स्वाक्षऱ्या करण्यात आल्या होत्या. प्रकरणाचा आत्ताभांडाफोड होऊन दोषी असणाऱ्या वर कार्यवाही अटळ असल्याने 9 ऑक्टोबर रोजी संबंधित बाबूच्या ताब्यातील डॉक्युमेंट्स पळवून नेण्याचा प्रकार घडल्याने पुन्हा तक्रारदार अमजद खान अयुब खान पठाण यांनी महागाव गटविकास अधिकाऱ्याकडे तशा आशयाची तक्रार दाखल केली आहे. वाकोडी गावामध्ये सिमेंट रोडचे 2020/21 या वर्षात सिमेंट रोड दुरुस्तीची कामे केली असल्याचे खोटे दर्शवून शासनाच्या पंधराव्या वित्त आयोगातील 1 लाख 36 हजार 21 रुपये एवढे बिल मिळवण्यासाठी शकलं लढवली असल्याचे समजते. चार वर्षांपूर्वी गावातील सिमेंट रोडचे काम केलेल्या खोट्या एमबी दस्तऐवजावर बिल मिळण्यासाठी दाखल झाले होते.
प्रकरण अंगलट येणार म्हणून या प्रकरणातील रोजगार सेवक ( डमी ठेकेदार), सरपंचांनी कामाचे देयके बनवणाऱ्या बाबूच्या स्वाधीन असलेले बनावट दस्तऐवज लांबवल्याचा खळबळ जनक आरोप तक्रारकरते अमजद खान अयुब खान पठाण यांनी नवभारतसी वार्तालाप करतांना केला. पंचायत समिती कार्यालयातील रेकॉर्ड पळविणे ही अतिशय गंभीर बाब आहे. महिनाभरापूर्वी रुजू झालेले गटविकास अधिकारी दत्तात्रेय कदम आता या प्रकरणात काय भूमिका घेतील? ज्या बाबूच्या ताब्यात हे डॉक्युमेंट्स होते, त्याच्याकडील डॉक्युमेंट्स पळविले गेल्याने ते संबंधित लोकांवर पोलीस स्टेशनला तक्रार देतील का? चौकशी दरम्यान या प्रकरणातील गौडबंगाल काय हे आता उघड होते की, प्रकरण गोलमाल होते ? हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.
(बनावट स्वाक्षरीची एमबी दस्तऐवज एफटीओ यांच्या ताब्यात असल्याने रेकॉर्ड सांभाळण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित बाबूची आहे. त्यांना माध्यमाने विचारणा केली असता माझ्या फक्त व्हाट्सअप वर एमबी आली आहे, असे उडवा उडवीचे प्रथम दर्शनी त्यांनी माहिती दिली. व्हाट्सअप वर आलेल्या एमबी नुसार मी बिल कसे काय देणार आहो? असे बनवाबनवीचे संबधीत बाबू कडून उत्तरे आलीत. वास्तविक तक्रारकर्त्यांनी संबंधित बाबूच्या ताब्यातील बोगस स्वाक्षरीचे दस्तऐवज लांबवल्याचे म्हटले आहे. त्यामुळे या बनावट प्रकरणात नेमके कोण सहभागी आहेत हे चौकशी दरम्यान उघड होणार आहे.)
(वाकोडी गावातील सिमेंट रोड कामा संदर्भातील तक्रार प्राप्त झाली आहे. सत्यता पडताळणीसाठी चौकशी समिती नेमण्यात आली आहे. नेमण्यात आलेल्या समितीमध्ये विस्तार अधिकारी, अभियंता व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. चौकशी समिती द्वारे येणाऱ्या अहवालानुसार या प्रकरणात दोषी आढळणाऱ्यावर निश्चितच कार्यवाही करण्यात येईल.)
दत्तात्रय कदम,
गटविकास अधिकारी, पं.स. महागाव







