🔸सातरी चनाखा बहुजन हिताय ऑटो चालक-मालक संघटनेने चुनाळा-विहिरगाव मार्गावरील खड्डेमय रस्त्यावर स्वखर्चाने टाकला मुरूम
✒️ सौ .सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.6 ऑक्टोबर)
राजुरा तालुक्यातील चुनाळा-विहिरगाव हा मार्ग गेल्या काही महिन्यांपासून अक्षरशः मृत्यू मार्ग बनला आहे . पावसाळ्याच्या दिवसात रस्त्यावरील मोठमोठे खड्डे एवढे भयावह झाले की प्रवाशांना आणि वाहनचालकांना रोज जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. स्थानिक नागरिक, ग्रामस्थ आणि प्रवासी यांनी वारंवार तक्रारी, निवेदने, अर्ज देऊन प्रशासनाला साद घातली पण नेहमीप्रमाणे आश्वासनांचा पाऊस पडला. शासनाकडून कोणतीच ठोस कारवाई न झाल्याने अखेर सातरी – चनाखा बहुजन हिताय ऑटो चालक-मालक संघटनेने सामाजिक बांधिलकी जोपासत पुढाकार घेतला. कोणत्याही राजकीय किंवा शासकीय मदतीशिवाय संघटनेने स्वतःच्या खिशातून खर्च करून सहा ते आठ ट्रॅक्टर मुरूम टाकून रस्त्यावरील सर्व खड्डे बुजविले. या कार्यामुळे ग्रामस्थ आणि प्रवाशांना काहीसा दिलासा मिळाला आहे. यावेळी प्रवाशांच्या संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळत आहे. “सरकारने करायचं काम आता जनतेलाच करावं लागतंय. आम्ही कर भरतो, पण बदल्यात खड्डे मिळतात.
या उपक्रमाबद्दल नागरिकांनी ऑटो संघटनेचे आभार मानले असून, या कृतीने शासन आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोकांच्या कराच्या पैशाने चालणारे रस्ते विभाग आणि ग्रामपंचायत नेमके करत काय आहेत. ग्रामस्थांनी वारंवार तक्रारी करूनही रस्ते दुरुस्ती का होत नाही.जर नागरिक आणि संघटना स्वतःच रस्ते दुरुस्त करत असतील, तर प्रशासनाच कामच काय. सातरी चनाखा बहुजन हिताय ऑटो चालक-मालक संघटनेचे सुरज खेडेकर, राजू मोरे, अमित नगराळे, मिलिंद लोखंडे, राहुल बोबडे, सूरज सोयाम,अरुण कार्लेकर,राहुल निरंजने, प्रशांत लोणारे,रवींद्र मोरे, प्रेम चितलवार, शंकर तोडासे, आनंद पाटील या सर्व चनाखा सातरी ऑटो चालक बंधूनी मोलाचे सहकार्य व अथक परिश्रम घेतले.







