उपकेंद्र खडका अंतर्गत करंजी येथे ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’अभियान

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.26 सप्टेंबर) :- 

महागाव तालुक्यातील खडका प्राथमिक आरोग्य उपकेंद्र अंतर्गत करंजी गावात ‘स्वस्थ नारी सशक्त परिवार’ अभियाना अंतर्गत बुधवारी 24 सप्टेंबर रोजी आरोग्य शिबीर राबविण्यात आले. यावेळी अभियाना अंतर्गत राबविण्यात आलेल्या शिबिरामध्ये विद्यार्थी, विद्यार्थिनी, गृहिणी तसेच युवक प्रौढ व्यक्तीची शारीरिक तपासणी करण्यात आली. या शिबिराचे उद्घाटन करंजी गावचे सरपंच तातेराव वानखेडे यांच्या हस्ते संपन्न झाले. 

बुधवारी प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खडका यांच्या वतीने करंजी गावात बुधवारी पार पडलेल्या शिबिरासाठी येथील उपसरपंच सुधाकर राठोड यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिकांनी यावेळी उपस्थिती दर्शविली होती.

करंजी, चिलगव्हाण व महादेववाडी येथील महिलांची रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, सिकलसेल व रक्त तपासणीचे नमुने, कर्करोग स्क्रीनिंग, क्षय रोग तपासणी, कृष्ठरोग तपासणी, गरोदर व स्तनदामाता तपासणी करण्यात आली. महिलांना पोषक आहार, लसीकरण, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना बाबत माहिती देऊन आहार प्रदर्शनी व शासनाच्या आरोग्य योजना बाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. या प्रसंगी Ni-kshay एन्ट्री व SNSP पोर्टल एन्ट्री करण्यात आल्या. महिलांना परिसर स्वच्छत ठेवण्यासाठी स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात आले. सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने किटकजन्य आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही खास उपाय योजना बाबत यावेळी संबंधितांनी मार्गदर्शन केले. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याच्या सूचना देण्यात आल्या.

या शिबिरासाठी डॉ. एम. व्ही. कदम सीएचओ, बी.पी.आंबेकर एएनएम, पी. एल. राठोड एमपीडब्ल्यू, वर्षा खंदारे गट प्रवर्तक तसेच प्राथमिक आरोग्य उपकेंद्र खडका अंतर्गत सर्व आशाताई आणि सर्व अंगणवाडी सेविका यांचे सह करंजी येथील ग्रामपंचायत कर्मचारी गजानन तळणकर हे उपस्थित होते.