माढेळीचे आराध्य दैवत संत हरिदास महाराजांचे प्रथम दर्शन – गावकऱ्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

✒️होमेश वरभे (माढेळी प्रतिनिधी)

माढेळी(दि.21 सप्टेंबर) :- 

माढेळीचे आराध्य दैवत व ग्रामदैवत श्री संत हरिदास महाराज यांचे मूळ स्वरूप आजवर कोणालाच पाहायला मिळाले नव्हते. महाराजांचे खरे रूप कसे होते, ही उत्सुकता अनेक पिढ्यांपासून ग्रामस्थांच्या मनात होती. मात्र माढेळीचेच मूर्तिकार विजय आगलावे यांनी आपल्या अप्रतिम कलेच्या माध्यमातून संत हरिदास महाराजांचे दर्शन घडवले. त्यांच्या कलेतून साकारलेले हे दिव्य चित्र आज संपूर्ण गावासाठी पुजाअर्चना आणि श्रद्धेचे प्रतिक ठरले आहे.

या ऐतिहासिक प्रसंगी हनुमान गणेश मंडळाच्या वतीने मूर्तिकार विजय आगलावे यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास वॉर्डातील प्रतिष्ठित नागरिक भीमरावजी वाटकर, विकासजी काकडे, प्रकाश आकुलवार, नीलकंठजी किन्हेकर, नानाजी वादाफळे, दिलीपजी साखरकर, ईश्वरजी दुर्गे, कमलाकरजी किन्हेकर आदी मान्यवर उपस्थित होते. मंडळाचे अध्यक्ष गुलाब उर्फ विनोद वादाफळे तसेच मंडळाचे सर्व कार्यकर्ते यांनी या सोहळ्याचे आयोजन करून उपस्थितांची मने जिंकली.

गावकऱ्यांनी या चित्राकडे पाहून भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. “आजपर्यंत आमच्या मनातील शंकेचे समाधान झाले. आज आम्हाला आपल्या आराध्य दैवताचे खरे दर्शन झाले, जणू महाराज समोरच उभे आहेत,” असे गावकरी म्हणाले.

स्वतः मूर्तिकार विजय आगलावे यांनीही आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, “हे कार्य माझ्यासाठी एक भाग्य आहे. गावाचे आराध्य दैवत हरिदास महाराजांचे दर्शन माझ्या हातून गावकऱ्यांना झाले, यापेक्षा मोठा सन्मान माझ्यासाठी काही असू शकत नाही.

माढेळीचे आराध्य दैवत संत हरिदास महाराजांचे हे चित्र गावाच्या अध्यात्मिक परंपरेत एक नवे पर्व निर्माण करणारे ठरले आहे. भक्तांच्या मनात श्रद्धा, विश्वास आणि अध्यात्माची ज्योत चेतवणारी ही घटना माढेळीच्या धार्मिक इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरली जाईल, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला.