करंजखेड येथील महिलांचा दारूबंदीसाठी एल्गार

🔹सर्रास पोलिसांच्या मुकसंमतीने चालू असलेली दारूविक्री तात्काळ थांबवा, अन्यथा पोलीस स्टेशनवर ठिय्या आंदोलन करू महीलांचा इशारा

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.17 सप्टेंबर) :- 

महागाव शहरासह अनेक गाव खेड्यात केमिकल युक्त देशीदारू आणि गावठी दारूचा प्रचंड प्रमाणात सर्रास विक्री चालू आहे. त्या मुळे अनेकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. अनेक महिलांचे संसार उघड्यावर आले आहे, परिणामी करंजखेड गावात शांतता व सुव्यवस्थेच्या प्रश्न उद्भवला आहे. बुधवारी करंजखेड येथील अनेक महिलांनी महागाव पोलीस स्टेशनवर धडक देत दारूबंदी साठी एल्गार पुकारला आहे.

   मागील अनेक दिवसांपासून महागाव पोलिसांच्या हप्तेखोर प्रवृत्तीमुळे करंजखेड हद्दीमध्ये देशी, गावठी दारूच्या विक्रीत प्रचंड वाढ झाली असल्यांचा महिलांनी निवेदनातून आरोप केला आहे. या ठिकाणीचे दारू विक्रेते भयंकर मग्रूर झाले असून आमची कोणीही दारूबंदी करू शकत नाही? आम्ही पोलिसांना देऊन घेऊन चालवतो अशी उघड बोलण्याची हिंमत या विक्रेत्यांची झाली आहे. येथील बऱ्याच युवकांमध्ये सर्रास मिळणाऱ्या दारू मुळे व्यसनाचे प्रचंड प्रमाण जडले आहे. तरुण पिढी दारूच्या व्यसनाकडे वळल्याने अनेक महिलांचे संसार उघड्यावर आले आहेत. दारूच्या प्रचंड व्यसनामुळे अनेकांच्या संसारात कल्लोळ निर्माण झाला आहे. या दारूमुळे करंजखेड गावातील महिला पुरुषांच्या कौटुंबिक आत्महत्या झाल्याचे वास्तवआहे.

देशीदारू मुळे महिलांमध्ये दारूड्या पती विरोधात आणि दारू विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या विरोधात ‌प्रचंड असंतोष निर्माण झाला असून शेकडो महिला दारूबंदी तात्काळ बंद व्हावी यासाठी महागाव पोलीस स्टेशनवर धडकल्या. यावेळी दारूबंदीसाठी एल्गार पुकारलेल्या महिलांचे नेतृत्व पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप ठाकरे, महागाव नगरपंचायतचे काँग्रेस गटनेते शैलेश कोपरकर, भरोस चव्हाण यांनी केले. करंजखेड गावामध्ये पुढील पंधरवड्यात सरसकट दारूबंदी न झाल्यास अनेक महिलांनी करंजखेड येथील पदाधिकाऱ्या सह पोलिस ठाण्यामध्ये ठिया आंदोलन करण्याचा इशारा दिला. येत्या 30 सप्टेंबर पर्यंत संपूर्ण परिसरातील दारू विक्रीवर पायबंद घालावा अन्यथा दोन ऑक्टोबर गांधी जयंती दिनी महागाव तहसील कार्यासमोर अनेक महिला पुरुष रास्तारोको आंदोलन करणार असल्याचे या वेळी निवेदनामध्ये नमूद करण्यात आले.

17 सप्टेंबर रोजी करंजखेड ग्रामपंचायतच्या सरपंच्या सौ. स्नेहा संदीप ठाकरे यांनी ठराव घेऊन करंजखेड येथील चालू असलेली दारूविक्री तात्काळ बंद करण्यात यावी, चालू असलेल्या दारू विक्रीचा प्रसंगी निषेध करण्यात आला. या वेळी करंजखेड येथील शेकडो महिला निवेदन देतांना उपस्थित होत्या. या वेळी महागाव पंचायत समितीचे माजी सदस्य संदीप ठाकरे, महागाव नगरपंचायतचे काँग्रेस गटनेते शैलेश कोपरकर, भरोस चव्हाण यांची उपस्थिती होती.