🔹महागाव पुसद रोडवर सामाजिक कार्यकर्त्यांनी केले स्वखर्चातून समाज हित जोपासत कार्य
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागांव(दि .17 सप्टेंबर) :- शहरातून पुसदकडे जाणाऱ्या मार्गावर करंजखेड फाटा या ठिकाणी अपघात ग्रस्त वळणावरती वाहनांना होणारा संभाव्य धोका टाळण्यासाठी महागाव येथील युवा कार्यकर्ते श्री. कन्स्ट्रक्शनचे संचालक यांनी समाजा प्रती आपले काही देणे असावे, या उदात्त हेतूने समाजोपयोगी कार्य करीत या ठिकाणी गतिरोधकावर झेब्रा क्रॉसिंग करून होणारे अपघात रोखण्यासाठी उपाययोजना केल्या. या गतिरोधकावर आता जलद वाहनाचा वेग कमी होऊन अपघाताच्या घटना टळण्यासाठी मदत होणार आहे. त्या मुळे प्रवाशांना या मार्गावरून काहीसा दिलासा मिळत आहे.
महागाव कडे येतांना गावालगत करंजखेड फाटा वळण रस्ता भयंकर धोकादायक ठरलेला आहे. या मार्गावरून नागपूर, अमरावती, श्रीक्षेत्र माहूर, नांदेड जाणारे सुपर एक्सप्रेस वाहने अतिशय जलद गतीने धावतात. या टर्न वळणावर गंभीरअपघाताच्या घटना घडल्या आहेत. या गंभीर प्रकाराची प्रशासनाने दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने,रस्ते दुरुस्ती देखभाल विभागाने एवढी मोठी अपघाताची घटना या ठिकाणी घडली असतांना तातडीने गतिरोधक, दिशादर्शक फलक लावणे गरजेचे होते. प्रशासनाने या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष, डोळेझाक केले आहे. 29 ऑगस्ट रोजी अमरावती यवतमाळ मार्गे उमरखेड कडे जाणाऱ्या एसटी महामंडळाच्या बसचा अपघात होऊन करंजखेड येथील मोटर सायकल स्वार युवकास जबर धडक लागल्याने भीषण अपघात होऊन युवक ठार झाल्याची घटना घडली होती.
या सर्व घटनेमुळे सामाजिक बांधिलकी जोपासत, प्रवाशांच्या हितासाठी महागाव येथील युवा कार्यकर्ते प्रवीण पाटील नरवाडे यांनी स्वखर्चातून आपल्या सहकार्याच्या मदतीने सदर जनहिताचे कार्य हाती घेतले आहे. त्यांच्या होऊ घातलेल्या कार्यामुळे प्रवाशांचे हित जोपासले जात आहेत. युवा कार्यकर्ते प्रवीण पाटील यांच्या कार्याची दखल घेत परिसरातील जनतेतून त्यांच्यावर कौतुकाची थाप पडत आहे.







