मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानांतर्गत…महागाव पंचायत समितीमध्ये दोन दिवशी कार्यशाळा संपन्न

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी) 

महागाव(दि.12 सप्टेंबर) :- 

महागाव पंचायत समिती मार्फत गट संशोधन केंद्र बीआरसी महागाव या ठिकाणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या विविध ग्रामपंचायतीच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना 11 सप्टेंबर गुरुवारी कार्यशाळेसाठी पाचारण करण्यात आले होते. दोन दिवसीय घेण्यात आलेल्या कार्यशाळेमध्ये दुसऱ्या दिवशी सरपंच आणि ग्रामीण जीवनोन्नती विभागाच्या अंगणवाडी सेविकांनी सहभाग नोंदविला होता. महागाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय खिल्लारे यांनी कार्यशाळेला संबोधित केले.

 ‌ 29 जुलै 2025 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अनुषंगाने 06 ऑगस्ट 2025 रोजी राज्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याचे आदेश पारित झाले. जिल्ह्यामध्ये प्रत्येक पंचायत समितीत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्यासाठी गटविकास अधिकारी कार्यालया मार्फत ग्रामपंचायतीचे सर्व ग्रामविकास अधिकारी, सरपंच,अंगणवाडी सेविकांसाठी बुधवार आणि गुरुवार दोन दिवस पंचायत समिती महागाव येथील गट संशोधन केंद्र बीआरसी, महागाव या ठिकाणी कार्यशाळा घेण्यात आली. संयुक्त राष्ट्र संघाने शाश्वत विकासासाठी जागतिक परिवर्तन कार्यक्रम 2030 जाहीर केला. ‘सर्वांना सोबत घेऊन चला’ हा या जागतिक कार्यक्रमाचा गाभा आहे. संयुक्तराष्ट्र संघाने 17 शाश्वत विकास ध्येय व त्या नंतर 169 लक्ष,उद्दिष्टे जाहीर केली. त्याची अंमलबजावणी 01जानेवारी 2016 पासून भारतात सुरू करण्यात आली. भारत सरकारच्या पंचायतराज विभागाने शाश्वत विकासाच्या ध्येयाच्या स्थानीकीकरणा साठी शाश्वत विकासाच्या ध्येयांचे नवरत्न संकल्पनेमध्ये रूपांतर केले. त्या अनुषंगाने ग्रामीण विकासासाठी शासनाद्वारे विविध उपाय योजना आखल्या जात आहेत.

   ग्रामीण भागाच्या विकासामध्ये पंचायतराज संस्थेचे मोठे योगदान असते. पंचायत राज संस्थेमार्फत ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे हे या अभियानाचे मुख्य उद्दिष्ट आहे‌. विकासाच्या बहुतांश योजना पंचायतराज संस्थेच्या मार्फत राबविल्या जातात. त्या अनुषंगाने ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्यसंस्था म्हणून काम करणाऱ्या ग्रामपंचायतच्या कामगिरीनुसार प्रोत्साहित करून कार्यक्षमता वाढविण्यासाठी कार्यशाळेतून गटविकास अधिकारी विजय खिल्लारे यांनी मार्गदर्शन केले. ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषद मार्फत विविध योजना राबविल्या जाणार आहेत. सदर योजनांची प्रभावी व जलद गतीने अंमलबजावणी करून त्याचा लाभ ग्रामीण भागातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविणे व यातून ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान उंचावणे गरजेचे असल्याचे या वेळी संबोधित करण्यात आले. गाव पातळीवर कार्य करणाऱ्या ग्राम विकास अधिकारी, सरपंच सोबतच अंगणवाडी सेविकांनी कार्य गतिमान करीत लोकसहभागाची चळवळ निर्माण करून ग्रामीण सेवा देणे गरजेचे झाले आहे.

महाराष्ट्रातील थोर संत परंपरेचा या मध्ये सहभाग घेत ग्रामीण भागातील नागरिकांचे आरोग्य, शिक्षण, उपजीविका सामाजिक न्याय या मध्ये क्षेत्रांमध्ये ग्रामपंचायतीचा सहभाग वाढवून पंचायतराज संस्था गतिमान करणे या संकल्पनेतून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान राबविण्याची शासनाचे संकल्पना असल्याचे या वेळी कार्यशाळेतून संबोधित करण्यात आले‌. या प्रसंगी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी यांची 10 सप्टेंबर रोजी कार्यशाळा पार पडली. तर सरपंच आणि ग्रामीण जीवन्नोती विभागाच्या अंगणवाडी सेविकांची 11 सप्टेंबर रोजी कार्यशाळा घेण्यात आल्याचे पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विजय खिलारे यांनी वार्तालाप करतांना स्पष्ट केले.