छतावरील पाण्याच्या टाकीत पडून तरुणीचा मृत्यू

✒️शेख रफिक माहूर (Mahur तालुका प्रतिनिधी)

माहूर (दि.3 सप्टेंबर) :- तालुक्यातील हडसणी येथे महालक्ष्मी सणासाठी आजोबांच्या घरी आलेल्या १७ वर्षीय तरुणीचा छतावरील पाण्याच्या टाकीत पडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना दि २ रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास घडली आहे.

मृत तरुणीचे नाव कु. राधिका दिलीप तारमेकवाड असे असून ती किनवट (गोकुंदा) येथील रहिवासी होती. महालक्ष्मी सणानिमित्त ती आपल्या आजोबा विठ्ठल तुकाराम दुर्गेवाड यांच्या हडसणी येथील घरी आली होती.दि. २ सप्टेंबर रोजी दुपारी सुमारास राधिका ही घराच्या दुसऱ्या मजल्यावरील छतावर गेली असता, तेथील पाण्याच्या टाकीत पडली असल्याचे नातेवाईक यांच्या कडून सांगण्यात आले काही वेळानंतर ही घटना उघडकीस आली. तात्काळ तिला माहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती तिला मृत घोषित केले.

या घटनेची माहिती मिळताच पो.नि. गणेश कराड यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि. संदीप अन्येबोईनवाड, तसेच पोलीस कर्मचारी प्रकाश मडावी व खंदाडे यांनी पंचनामा केला. मृतदेहाचे शवविच्छेदन वैद्यकीय अधिकारी डॉ. अक्षय सांगळे यांनी केले.या अनपेक्षित अपघाती मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.