🔸स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
✒️विश्वनाथ महामुने यवतमाळ(Yavtmal विभागीय प्रतिनिधी)
यवतमाळ(दि.25 ऑगस्ट) :- पुसद व उमरखेड उपविभागासह यवतमाळ शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या दरोडा व घरफोडीच्या आठ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून, त्यांच्या कडून जवळपास एक लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
यवतमाळ जिल्ह्यात वाढत्या चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी व अवैध धंद्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिस अधीक्षक कुमार चिंता यांनी विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण व गुप्त माहितीच्या आधारे वडद ता. महागाव येथून आरोपी सोपान शालीक व्यवहारे (२२), शिलानंद अर्जुन पडघणे (३०) व दिनेश शालीक व्यवहारे (२६) यांना ताब्यात घेतले.
चौकशीत आरोपींनी कबुली दिल्यानंतर त्यांनी यवतमाळ जिल्ह्यातील ०७ घरफोडी व ०१ दरोडा असे एकूण ०८ गुन्हे केल्याचे उघड झाले. त्यांच्या कडून सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण ₹ ९४,५५८ किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदर आरोपींना पुढील तपासासाठी पुसद ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी.जे. यांच्या मार्गदर्शना खाली करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सतीष चवरे, सायबर सेलच्या पोलिस निरीक्षक येशोधरा मुनेश्वर यांच्या नेतृत्वाखालील पथकात स.पो.नि. धिरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक शरद लोहकरे यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा व सायबर सेल यवतमाळचे जवान सहभागी होते.







