महागाव बायपासचे रखडलेले काम अपघातास कारणीभुत

🔹हिवरा येथील बायपासचे काम प्रलंबित असल्याने खड्डेमय रस्त्यावर अपघाताची मालिका नेहमी सुरूच

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि,19 ऑगस्ट) :- बायपासचे काम अद्याप न झाल्याने खड्डेमय रस्त्यातून वाट काढतांना वाहनधारकांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागत आहे. ह्या बायपास वरील खड्डे रस्त्यावर अपघातास कारणीभुत ठरत आहे. अपघाताची मालिका सुरूच आहे. दोन्हीही ठिकाणच्या टोलद्वारे मात्र गाड्यावाल्यांना नियमित टोलटॅक्स घ्यावा लागतो आहे. डागडूगी कडे मात्र संबंधितांचे दुर्लक्ष होत आहे. 

    महागाव तालुक्यातुन गेलेल्या नागपुर बोरी तुळजापुर राष्ट्रीय महामार्गावर(क्र.३६१) हिवरा(संगम) येथे बायपासचे काम प्रस्तावित आहे.परंतु नागपूर ते तुळजापुर रस्त्याचे काम पुर्ण होवुन सुध्दा येथील बायपासचे काम अद्याप सुरू झाले नाही.त्या मुळे वाहतूक गावातून असलेल्या जुन्या डांबरी रस्त्याने सुरू आहे.या रस्त्यावरून दररोज धावणाऱ्या हजारो अवजड वाहनांमुळे या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे.

महामार्ग प्राधिकरण या खड्ड्यांवर तात्पुरती लिपापोती करून वेळ काढू धोरण राबवित आहे.परंतु ज्या ठिकाणावरून प्रस्तावित असलेला बायपास सुरू होणार आहे.त्याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.महामार्गावरून सुसाट वेगाने येणाऱ्या वाहनधारकांना या खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अनेक अपघात घडत आहेत. या ठिकाणी अपघाताची मालिका आजही सुरूच आहे.या ठिकाणी झालेल्या अपघातात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, तर काहींना कायमचे अपंगत्व आले. स्वातंत्र्यदिनाच्या रात्री नागपुर येथे शिमला मिरची घेवुन जाणारा ट्रक एम. एच. १३/इ.एफ. १९७९ च्या चालकाला या खड्ड्यांचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी झाला. सुदैवाने यात अपघातात ड्रायव्हर, क्लीनर किरकोळ जखमी झाले,कोणतीही मोठी जीवितहानी झाली नाही.

बायपासचे काम पुर्ण झालेच नसतांना मात्र महामार्ग प्राधिकरणाने बिजोरा व भांब राजा येथे टोल उभारून वसुली चालु केली आहे.या टोल वसुलीतून दररोज कोट्यवधी रुपयांची रक्कम गोळा केली जात असतांना याच मार्गावर रखडलेल्या बायपासच्या कामामुळे आपल्या जीवाला मुकण्याची वेळ महामार्ग प्राधिकरणाने वाहनधारकांवर आणली आहे. जो पर्यंत हिवरा येथील बायपासचे काम पुर्ण होणार नाही, तोपर्यंत दोन्ही टोल नाक्यांवरची टोल वसुली बंद करण्यात यावी अशी मागणी वाहनधारकांतुन होत आहे.