शनिवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे महागाव तालुक्यात नदी नाल्यांना महापूर, वेणी धरण‌ झाले ओहरफ्लो 

🔹धनोडा पैनगंगा नदी वरील पुलावर दोन दिवसापासून पुराचा प्रवाह चालू आहे

🔸फुलसावंगी गावासह अनेक ठिकाणची अभूतपूर्व पूरस्थिती 

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.19 ऑगस्ट) :- शनिवारी 16 आगस्ट रोजी दुपारी १२ वाजल्यापासून तीन वाजेपर्यंत महागाव तालुक्यात प्रचंड ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यामध्ये महागाव,फुलसावंगी, धनोडा, हिवरा, राहुर, मोरथ, वाकोडी, कासोळा, करंजखेड यासह अनेक गावाचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला होता. गावाच्या इतिहासात कधीही न पाहिलेला एवढा मोठा पैनगंगा, पुसनदीला पूर या वर्षी पहिल्यांदा आला. संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. प्रशासनाकडून मदत कार्यासाठी मागणी होत आहे.

  सतत धार पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाला होता. परिणामी ग्रामीण भागात मोबाईल नेटवर्क पूर्णपणे विस्कळीत झाल्यामुळे बाहेरील जगाशी संपर्क तुटला आहे. आणि गावातील गंभीर परिस्थितीबाबत योग्य माहिती वेळेवर पोहोचू शकत नाही.

महागाव तालुक्यातील धनोडा येथील पैनगंगा नदी पुलावर शनिवार, रविवार दोन्ही दिवस पूर ओसंडून वाहत आहे. रविवारी आजही दोन फुटापर्यंत पुलावरून पाण्याचा प्रवाह चालू आहे. त्यामुळे श्रीक्षेत्र माहूर कडे जाणाऱ्या प्रवाशांना दोन दिवस अडथळा निर्माण झाला. तालुक्यातील पैनगंगेसह पुसनदी आणि नाल्यांना लागून असलेल्या गावातील घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरले आहे. नागरिक अडकून पडले आहेत. शेतकऱ्यांचे जनावरे, गोठे, तसेच शेतात उभे असलेले पिके व सौरऊर्जा यंत्रणा पाण्यात वाहून गेली आहेत. शेतकऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान झाले. या संकटामुळे त्यांच्या कुटुंबांवर उपजीविकेचे मोठे संकट ओढावले आहे.इतक्या गंभीर परिस्थितीत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून बचावकार्य सुरू करणे ही अत्यावश्यक बाब आहे. पूरग्रस्तांना सुरक्षित स्थळी हलविणे, त्यांना निवारा, अन्नधान्य व वैद्यकीय मदत पुरवणे ही वेळेची गरज आहे. नेटवर्क बंद असल्यामुळे परिस्थितीची योग्य माहिती वेळेत मिळत नसल्याने गावकऱ्यांचे हाल अधिकच वाढले आहेत.

गजानन महाराज देवस्थान अंबोडा या ठिकाणी पूरग्रस्तांना भोजन व्यवस्था आणि मदत करण्यासाठी देवस्थानचे अध्यक्ष हानोतराव देशमुख यांनी अंबोडा वाशीयांच्या मदतीने उत्कृष्ट कार्य केले. महागाव तहसीलदारांमार्फत तात्काळ या परिस्थितीकडे लक्ष घालून प्रशासन यंत्रणा गावात पोहोचवावी, जेणेकरून नागरिकांचे प्राण वाचतील आणि शेतकऱ्यांचे नुकसान काही प्रमाणात तरी भरून निघेल अशी नागरिक अपेक्षा व्यक्त होत.फुलसावंगीकर आज जीवाच्या भीतीने जगत आहेत. त्यांचे प्राणरक्षण, उपजीविकेचे संरक्षण आणि भविष्यातील मदत व पुनर्वसनासाठी शासनाने त्वरित आणि प्रभावी पावले उचलणे हीच सध्याची मोठी गरज आहे.

हिवरा या ठिकाणी शशिकला देवकर या वृद्ध महिलेच्या झोपडीला पुराच्या पाण्याने वेढले होते अशा परिस्थितीत हिम्मत करून हिवरा येथील उपसरपंच शरद पाटील यांनी आपल्या सहकारी बिहारीलाल जैस्वाल आणि इतर मित्रांच्या मदतीने ग्रामपंचायत कार्यालयात आणून तिला वैद्यकीय उपचार देऊन तिचा जीव वाचविला. पुरामध्ये अडकलेल्या प्रवाशांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आल्याने प्रवाशांना दिलासा मिळाला.

महागाव तालुक्याला पूर परिस्थितीने वेडा घातलेला आहे काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आणि काही गावाचा संपर्क तुटला आहे. अशा परिस्थितीमध्ये तालुक्याचे दंडाधिकारी तथा तहसीलदार अभय मस्के यावेळी गैरहजर होते. 15 ऑगस्ट कार्यक्रमा नंतर ते झेंडावंदन कार्यक्रम आठवण शनिवार रविवार सुट्टी असल्याने आपल्या मूळ गावी गेल्याचे ऐकिवात आहे. यामध्ये शनिवारी झालेल्या अतिवृष्टीने तालुक्याला झोडपून काढले, धाररमोहा येथील एक युवक नाल्याच्या पुरामध्ये वाहून जाण्याची दुर्दैवी घटना घडली. याप्रसंगी प्रशासनाचे प्रमुख गायब होते, तालुक्यातील जनतेचे मोठे दुर्दैव म्हणावे लागेल. अशा परिस्थितीमध्ये तहसीलदारांनी तात्काळ आपली भूमिका बजावून नुकसानग्रस्त भागात भेटी देऊन नुस्कानग्रस्तांना दिलासा दिला पाहिजे होता.