🔸महसूल आणि पोलीस विभागाची संयुक्त कार्यवाही
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव (दि.11 ऑगस्ट) :-
फुलसांगवी परिसरात बीड पॅटर्न राबविणाऱ्या गाव गुंडाच्या दहशतीला झुगारून गावकऱ्यांनी रक्षाबंधनच्या दिवशी फुलसांगवी बंदची हाक दिली. या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. रेती तस्कर व अवैध धंदे चालकांच्या मुस्क्या आवळण्याची नागरिकांनी मागणी केल्यानंतर सरते शेवटी महसूल आणि पोलीस प्रशासनाने एकदाचे कार्यवाही करण्याचे धाडस केले आहे, त्यामुळे परिसरातून समाधान व्यक्त होत आहे.
गावकऱ्यांचा आक्रोश चरम सीमेवर पोहोचल्यानंतर महसूल आणि पोलीस पथकाने संयुक्तरित्या फुलसांगवी परिसरातील हिंगणी पेंढावर अवैधरित्या चोरट्यांनी साठवून ठेवलेल्या रेती साठ्यावर धाड टाकली. 10ऑगस्ट रोजी 47 ब्रास रेती जप्त करण्याची कार्यवाहीआली. पैनगंगा नदी पात्रात जागोजागी रेतीसाठे करून रेती तस्कर चोरट्या मार्गाने रेतीची विल्हेवाट लावतात. एवढे दिवस रेती साठा पोलिसांना आणि महसूल प्रशासनाला आजवर का दिसला नाही, याचे जनतेला कुतूहल वाटते.
तालुक्यातील फुलसांगवी परिसरात चालढकल कार्यवाहीमुळे आज तागायत या ठिकाणी चोरटी वाहतूक सुरूच आहे. प्रशासन आता ॲक्शन मोडवर आले असून धडक कार्यवाही करण्यात आली. तहसीलदार अभय मस्के यांना हिंगणी पेंढावर मोठ्या प्रमाणात रेतीची अवैध साठवणूक झाल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तत्काळ विनोद ढोणे तलाठी फुलसांगवी यांना पथकासह घटनास्थळी पाठवले. पथकाने केलेल्या तपासणी 47 ब्रास रेती अवैधरित्या साठवून ठेवलेली आढळली. त्यानंतर पंचनामा करून रेती जप्त करण्यात आली.
ही कार्यवाही फुलसांगवी बीटजमादार गजानन खेडतकर, पोलीस शिपाई विशाल गेडाम, महसूल विभागाचे तलाठी विनोद ढोणे यांनी संयुक्त कार्यवाही केली. तहसीलदार मस्के यांनी सांगितले की शासनाच्या धोरणानुसार ही रेती घरकुल योजनेतील लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणार आहे. या कारवाईमुळे रेती तस्करामध्ये मोठी दहशत निर्माण झाली. गावकऱ्यांनी प्रशासनाच्या या तत्पर कारवाईने समाधान व्यक्त केले.







