🔹फुलसांगवी पोलिस चौकी रेती तस्कराच्या ताब्यात
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon प्रतिनिधी)
महागाव(दि.11 ऑगस्ट) :-
फुलसांगवी परिसर व महागाव तालुक्यामध्ये वाढत असलेल्या अवैध धंद्याच्या व गुन्हेगारीच्या विरोधात प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. तालुक्यातील फोफावलेले अवैध धंदे आणि गुन्हेगारीच्या विरोधात स्वतःच पुढाकार घेतल्याशिवाय गुन्हेगारी नियंत्रणात येणार नाही, या साठी ज्या गावांमध्ये हा विषय गंभीर आहे, त्या गावात अवैधधंदे व गुन्हेगारीचे समुळ उच्चाटन होण्यासाठी समित्या स्थापन करण्यात येणार आहेत. त्या साठी पुढाकार घेत असल्याचे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष एड. सचिन नाईक यांनी महागाव येथील विश्रांती गृहावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
10 ऑगस्ट रोजी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत एड. सचिन नाईक यांनी विचार व्यक्त केले. ते म्हणाले फुलसांगवी या बाजारपेठेच्या ठिकाणी प्रचंड प्रमाणात अवैध धंदे फोफावले आहेत. या शिवाय येथे चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे.
नुकतेच तीन दिवसापूर्वी फुलसांगवी येथील भांडे विक्रेता व्यापाऱ्यांच्या घरी बावीस लाखांच्या रोकड सह दागिने चोरी होण्याची मोठी घटना घडली. पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर तब्बल पंधरा तासानंतर एफआयआर करण्यात आला. पोलीस या प्रकरणी चौकशी करीत असतांना काही लोक या चौकशीमध्ये अटकाव करीत असल्याचा गुन्हा महागाव पोलिसांनी दाखल केला.अटकाव करणारा व्यक्ती या पूर्वी फुलसांगवीच्या चोरीच्या मोठ्या प्रकरणात आरोपी असल्याचे कळते. त्याच्यावरती माहूर पोलिसांनी पोलीस अधिकाऱ्याला रेती तस्करीच्या प्रकरणांमध्ये मारहाण केल्याचा गुन्हा दाखल केला असून या शिवाय त्याच्यावरती इतर अनेक गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, ही बाब अतिशय चिंतनीय आहे.
पोलीस प्रशासनाचा या ठिकाणी वचकच संपल्याचा दिसतो आहे. नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी फुलसांगवी येथे सर्व व्यापाऱ्यांनी या मोठ्या चोरीच्या घटनेतील गुन्हेगाराला तातडीने अटक करावी, आणि या ठिकाणी शांतता व सुव्यवस्था अबाधित राहावी या साठी बंद पुकारला असतांनाही पाच टिप्पर द्वारे रेती तस्करी सुरू होती. भांब गावाजवळ नागरिकांनी पोलिसांना सूचना केल्यानंतर एक रेतीने भरलेले टिपरवर कार्यवाही करण्यात आली. परिसरात पैनगंगा नदी पात्रात चारशे ते पाचशे ब्रास अवैध रेती साठा असून प्रशासनाने तो साठा जप्त करण्याची हिंमत दाखवीत कार्यवाही करुन घरकुल लाभार्थ्यांना देता येईल. परंतु महसूल प्रशासन बघ्याची भूमिका निभावण्यात धन्यता मानतअसल्याचा आरोप या वेळी पत्रकार परिषदेत एड. सचिन नाईक यांनी केला.
“फुलसांगवी येथे पोलीस विभागाची चौकी कार्यरत आहे. या ठिकाणी अद्याप सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे सौजन्य पोलीस प्रशासनाने दाखविले नाही याचे नेमके कारण काय? येथील शासकीय गोडाऊनवर खाजगी लोकांनी ताबा केला आहे. पोलीस विभागाची चौकी रेती तस्करांच्या ताब्यात आहे. पोलीस अधीक्षकांनी या गंभीर बाबीची दखल घ्यावी”…..एड. सचिन नाईक,महाराष्ट्र काँग्रेस कमिटी उपाध्यक्ष







