🔹चंद्रपूर जिल्ह्यातील हजारो कामगार संपात सहभागी – कोळसा उत्खनन पुर्णत: ठप्प
🔸भर पावसात कामगारांची निदर्शने
🔸अंगणवाड्या बंद, बॅक व पोष्ट प्रभावित
✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.10 जुलै) :- चंद्रपूर जिल्ह्यातील वेकोलिच्या कोळसा खाणीत दिनांक 9 जुलै रोजी पुकारलेल्या राष्ट्रव्यापी बंद ला जोरदार प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील सर्व कोळसा खाणीतील 80 टक्के कामगार संपावर होते. त्यामुळे कोळशाचे उत्पादन व माईन्स ते डम्पिंग यार्ड पर्यंत ची कोळसा वाहतूक पुर्णपणे ठप्प होती.
पहिल्या आणि दुस-या पाळीत कामगारांनी कोळसा खाणीच्या गेट वर जोरदार घोषणा देऊन केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा निषेध केला. तिस-या पाळीतील कामगारही संपात सहभागी झाले. चंद्रपूर जिल्ह्य़ातील सर्व राष्ट्रीयीकृत बँक, पोष्ट ऑफिस, दूरसंचार विभाग कार्यालय व जिल्ह्यातील अंगणवाडी सेविकांच्या संघटनेने या संपात हिरीरीने भाग घेतला. या संपामुळे कामगारांची एकजुटता पुन्हा अधोरेखीत झाली असून केंद्र सरकारच्या कामगार विरोधी व उद्योगपतीधार्जीण्या धोरणांचा विरोध दर्शविण्यात कामगार संघटना यशस्वी झाल्या आहेत.
आंदोलनात आयटक, एचएमएस, इंटक, सिटू या कोल इंडियातील कामगार संघटना, बॅक एम्प्लॉईज असोसिएशन, ग्रामीण डाकसेवक संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या. सकाळी सर्व केंद्रीय कार्यालयापुढे भर पावसात निदर्शने करून व संपात सहभागी होऊन कामगारांनी हा संप यशस्वी केल्याचा दावा कामगार नेत्यांनी केला.
केंद्र व राज्य सरकार सातत्याने कामगार विरोधी आणि उद्योगपती धार्जीणे धोरण राबवित असल्याने संपूर्ण देशात संघटीत व असंघटित कामगार क्षेत्रात प्रचंड असंतोष निर्माण झाला. महाराष्ट्र राज्य सरकार सुध्दा सामान्य जनतेची गळचेपी करणारे, लोकशाही विरोधी व अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर आणि न्याय्य मागण्यांसाठी लढणा-या नागरिकांच्या हक्कावर गदा आणणारे जनसुरक्षा विधेयक पारित करण्याची तयारी करीत आहे.
केंद्र सरकारने कामगार सुरक्षा कायद्यात अन्यायकारक बदल केल्याने या मुद्द्यांसह पेन्शन, शिक्षण, खाजगीकरण, नोक-यांचे आऊटसोर्सिग, आरोग्य, बॅक कर्मचा-यांचे प्रश्न, अंगणवाडी सेविकांच्या मागण्या, महागाई, शेतक-यांचे प्रश्न यासह अनेक न्याय्य मागण्यांसाठी आजचा देशव्यापी संप देशातील प्रमुख कामगार संघटना व बॅक एम्प्लॉईज असोसिएशन, ग्रामीण डाकसेवक संघटना, अंगणवाडी कर्मचारी संघटना यांनी पुकारला होता.







