गांधीतीर्थ स्वच्छ शाळा स्पर्धेत नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव (बुज) ला उल्लेखनीय पुरस्कार

🔹स्वच्छ शाळा राज्यस्तरीय प्रतियोगिता

✒️शेगाव बू (Shegaon bu विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

शेगाव बू (दि.4 जुलै) :- गांधीतीर्थ स्वच्छ शाळा या राज्यस्तरीय स्पर्धेत नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय शेगाव बुज राज्यातून उल्लेखनीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

गांधीतीर्थ स्वच्छ शाळा राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील गांधी विचार संस्कार परीक्षा मध्ये सहभाग नोंदविलेल्या 246 शाळांनी सहभाग नोंदवला होता. त्यात अंतिम 48 शाळांमधून स्वच्छतेचे सर्व उपक्रमांची अंमलबजावणी करणाऱ्या 37 शाळांमधून विशेष पुरस्कार साठी निवड होऊन सन्मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.

हे बक्षिस गांधी रिसर्च फाउंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशन सिस्टीमचे अध्यक्ष मा. अशोक जैन यांच्या हस्ते मुख्याध्यापक बी. जी. ढाकुणकर व समन्वयक शिक्षक नरेन्द्र कन्नाके सर यांनी स्वीकारले. सागर मित्र अभियानाचे सह संस्थापक मा.विनोद बोधनकर, जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकारी मा.मीनल करनवाल, महाराष्ट्र राज्य सल्लागार परिषदेचे सदस्य मा. अनिल बोरणारे, स्पर्धा समन्वयक मा. गिरीश कुलकर्णी या मान्यवरांच्या उपस्थितीत जळगावच्या जैन हिल्सवरील कस्तुरबा सभागृहात हा पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.

या प्रसंगी मुख्याध्यापक बी. जी. ढाकुणकर , नरेन्द्र कन्नाके, प्रमोद दातारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन गांधी रिसर्च फाउंडेशन जळगाव येथे करण्यात आले. उल्लेखनीय पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल संस्थेचे पदाधिकारी, सदस्य , तसेच शाळेचे सर्व शिक्षक वृंद, इतर कर्मचारी वर्ग, सर्वांनी अभिनंदन करून नेहरू विद्यालयाचे सर्वत्र कौतुक होत आहे.