वरोरा—भद्रावतीत कुणाचा जोर

🔹लोकसभा निवडणूकीच्या प्रचाराचा अंतिम आठवडा सुरू आहे

🔸प्रचारात अजूनही जोर चढला नाही

✒️चंद्रपूर.(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.10 एप्रिल) :- भाजपा—कॉंग्रेस या दोन पारंपारिक पक्षातच ही निवडणूक लढली जात आहे. बहुजन समाज पार्टी आणि वंचित आघाडी यांच्या उमेदवारांचा फारसा प्रभाव नाही. भाजपाचे सुधीर मुनगंटीवार हे बल्हारपूर निर्वाचन क्षेत्राचे प्रतिनिधीत्व करतात तर, कॉंग्रेसच्या श्रीमती प्रतिभा धानोरकर या वरोराच्या आमदार आहेत. वरोरा—भद्रावती हा त्यांचा स्वत:चा मतदार संघ असल्यांने या क्षेत्रात कुणाला आघाडी मिळेल? यावर राजकीय चिंतन सुरू आहे.

2019 च्या लोकसभा निवडणूकीत वरोरा—भद्रावतीचे प्रतिनिधीत्व करणारे बाळू धानोरकर यांना या क्षेत्रातून आघाडी मिळाली होती. स्थानिक नेतृत्व म्हणून ही आघाडी अपेक्षीतच होती मात्र चंद्रपूर जिल्हयातील चार मतदार संघापैकी सर्वात कमी मताधिक्य त्यांना त्यांच्या स्वत:च्या हक्काच्या मतदार संघात मिळाले होते, ही बाब नजरअंदाज करता येत नाही.

2019 च्या निवडणूकीत कॉंग्रेसचे बाळू धानोरकर यांना 88,627 मते मिळाली होती तर, भाजपाचे हंसराज अहिर यांना 76,167 मते मिळाली होती. बाळू धानोरकर यांना 12,460 मताधिक्य मिळाले होते. जिल्हयात ते सर्वात कमी मताधिक्य होते. वंचितचे राजेंद्र महाडोरे यांना 11,788 मते मिळाली होती. राजेंद्र महाडोरे आता भाजपात सुधीर मुनगंटीवार यांचा प्रचार करीत आहे.

2019 च्या निवडणूकीत बाळू धानोरकर यांचा विजय झाल्यानंतर, त्यांनी त्यांचे रिक्त झालेल्या आमदारकीसाठी आपली पत्नी प्रतिभा धानोरकर रिंगणात उभे केल्यांने, ज्यांनी बाळूभाऊ नंतर आपणच आमदार असे स्वप्न पाहिले, ते सर्व नंतर बाळूभाऊच्या विरोधात गेले. मात्र बाळूभाऊकडे सत्ता आली असल्यांने, त्यांची परिस्थिती ‘सहन होत नाही, आणि सांगता येत नाही’ अशी झाली होती.

या क्षेत्रात खासदार म्हणून बाळूभाऊ धानोरकर आणि आमदार म्हणून प्रतिभा धानोरकर यांना कोणतेही ठोस विकास कामे करता आली नाही. आमदार—खासदार निधी आणि खनिज विकास निधी या सहज मिळणार्या निधीशिवाय वरोरा—भद्रावतीत शुन्य विकास कामे आहेत, हीच बाब ठळकपणे भाजपाचे कार्यकर्ते वरोरा—भद्रावतीत सांगत फिरत आहेत.

2019 च्या निवडणूकीत बाळू धानोरकर यांना कॉंग्रेसची उमेदवारी मिळवून देण्यात ते त्यांना निवडूण आणण्यापर्यंत वरोरा भद्रावती क्षेत्राचे नेते, माजी विधानसभा उपाध्यक्ष मोरेश्वर टेमुर्डे यांनी काही काळातच, कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहून, बाळू धानोरकर यांना पुन्हा उमेदवारी देवू नये अशी जाहीर मागणी केली होती.

खासदार बाळू धानोरकर यांच्या ‘कार्याचा’ कच्चाचिठ्ठाही त्यांनी कॉंग्रेस वरिष्ठांना पाठविला होता तर, बाळू धानोरकर यांनीही टेमुर्डे यांना जोरदार प्रत्युत्तर दिले होते. दारूबंदीच्या काळातही खासदार धानोरकर यांची भूमिका संशयास्पद होती, याबाबतच्या बातम्या दिल्याचा राग त्याच्या कार्यकर्त्यानी पत्रकारांना झोडपून काढला होता. आपल्याच पक्षाच्या ताब्यात असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या चौकशीचा विषय असेल किंवा या बॅंकेचे अध्यक्ष संतोष रावत यांचेवरील गोळीबाराचे प्रकरण असेल या सर्वांमुळे बाळू धानोरकर यांची खासदारकी विकासापेक्षा वेगळ्याच कारणाने चर्चिल्या गेली होती.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंक भरती प्रकरणात त्यांचे जवळच्या नातेवाईकांची सुरू झालेली चौकशी व अन्य कारणामुळे खासदार म्हणून त्यांना वरोरा—भद्रावती क्षेत्रात ठोस कामे करता आली नाही. या सर्व पार्श्वभूमीवर विकास पुरूष म्हणून जिल्हयात ओळख निर्माण केलेले सुधीर मुनगंटीवार यांनी वरोरा—भद्रावतीकडे विषेश लक्ष देणे सुरू केले आहे. पदाधिकार्यांच्या बैठका, बुथ कार्यकर्त्याच्या बैठका, सभा घेणे सुरू केले आहे.

वरोरा—भद्रावतीत सुधीर मुनगंटीवार हे त्यांनी केलेल्या विकासाचे कामे घेवून प्रचार करीत आहेत, तर दुसरीकडे प्रतिभा धानोरकर यांचे कार्यकर्ते, केंद्र सरकारच्या अपयश सांगत मते मागीत आहेत. या मतदार संघातील ‘जात’ प्रतिभा धानोरकर यांचे फायद्याची असू शकते असे जाणकारांचे मते आहेत तर धानोरकर कुटूंबियांचे वरोरा—भद्रावती तालुक्यातील दारू दुकानाची ‘गर्दी’ त्यांचे महिला मते कमी करण्यास कारणीभूत ठरू शकते.

तर मुनगंटीवार असते वरोरा—भद्रावतीचे आमदार

2009 मध्ये लोकसभा विधानसभा पुर्नरचना झाल्यानंतर, चंद्रपूर विधानसभा अनुसूचित जाती करीता राखीव झाली. यामुळे या मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणारे सुधीर मुनगंटीवार यांनी दुसरा मतदार संघ शोधणे सुरू केले.

सुधीर मुनगंटीवार यांचे विकासात्मक दृष्टीकोण आणि वरोरा—भद्रावतीचे सामाजीक, सांस्कृतीक जडण—घडण यामुळे त्यांनी वरोरा भद्रावती मधून निवडणूक लढण्याची तयारी सुरू केली होती, मात्र चंद्रपूर विधानसभेतील काही भाग बल्हारपूर विधानसभेत समाविष्ट झाल्यांने आणि बल्हारपूर मतदार संघातून आमदारकी लढविण्यास शोभाताई फडणवीस यांनी त्यांना हिरवी झेंडी दिल्यांने, ते बल्हारपूर क्षेत्राचे आमदार झालेत आणि या क्षेत्रातील तीनही तालुक्यात भुतो न् भविष्यती असा विकास घडवून आणला.