आदिवासी समुदायाकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात

🔹किशोर टोंगे यांची आदिवासी विकास मंत्र्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

 ✒️मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.13 जानेवारी) :- वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्र हे आदिवासी बहुल चंद्रपूर जिल्ह्यात असून मोठ्या प्रमाणात आदिवासी बांधव ग्रामीण भागात राहत आहे. मात्र, ह्या गावांमध्ये आदिवासी वाड्या वस्त्यांची दयनीय दुरवस्था असून पायाभूत सुविधांची मोठी वानवा आहे. त्यामुळे ह्या गावांमध्ये आदिवासी समुदायाकरिता पायाभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी किशोर टोंगे यांनी आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आदिवासी समुदाय हा हरहुन्नरी असून उपजत कलागुण त्यांच्या अंगी आहे. मात्र वास्तव्यास असलेल्या वाड्या वस्त्यांच्या ठिकाणी पायाभूत सुविधा, बदलत्या काळाप्रमाणे शिक्षण व उपजिविकेसोबत त्यांच्या पारंपारिक व्यवसायाला बाजारपेठेशी योग्य पद्धतीने जोडल्यास त्यांना प्रवाहात येऊन स्व उन्नती साधण्यास मदत होईल.

याकरिता आपल्या स्तरावरून आढावा घेऊन या भागातील लोकांना जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी निधी उपलब्धता व कामाची योग्य त्या अंमलबजावणीच्या सूचना निर्गमित कराव्यात, अशी मागणी किशोर टोंगे यांनी मंत्रालयात डॉ. गावित यांची भेट घेऊन केली. यावेळी मंत्री डॉ. गावित यांनी सकारात्मक चर्चा केली व ह्या समस्या सोडविण्यात प्राधान्य देईल, असे आश्वासन श्री. टोंगे यांना दिले.