शेगांव खुर्द येथे आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे निवासी शिबीर संपन्न

40

✒️ आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू.(दि.25 जानेवारी) :- आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना युनिटतर्फे दि १८ जानेवारी ते २४ जानेवारी दरम्यान *‘शाश्वत विकासासाठी युवक’* या संकल्पनेवर आधारित विशेष निवासी शिबिराचे आयोजन शेगांव (खुर्द) करण्यात आले होते. विद्यार्थ्यांमध्ये समाजभान रुजावे तसेच त्यांना श्रमसंस्काराचे वळण लागावे या उद्देशाने आयोजित या निवासी शिबिरात वेगवेगळ्या प्रबोधन, श्रमदान व प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिरामध्ये शेगांव (खुर्द) ग्रामवासियांसाठी प्रामुख्याने कृषी व कृषीसंबंधित विषयांवर भर देण्यात आला होता. शिबिराचे उद्घाटन शेगांव गावचे सरपंच श्री. मोहितजी लभाने, तंटामुक्ती अध्यक्ष श्री. चंद्रशेखरजी भिवदरे तसेच कार्यक्रम अधिकारी डॉ. जोगी यांच्या उपस्थितीत तसेच आनंद निकेतन कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. सुहास पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. या सात दिवसीय निवासी शिबिरामध्ये शेतकऱ्यांना शेतीची तांत्रिक माहिती मिळावी व त्यांना शेतीपूरक गोष्टींना अवगत करण्यासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन कृषी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले होते.

यात प्रामुख्याने ग्रामस्वच्छता, उन्नत भारत अभियानांतर्गत ग्रामसर्वेक्षण, शेतकऱ्यांसाठी शेंद्रीय शेतीचे प्रात्यक्षिक व सल्ला, ग्रामप्रबोधनपर पथनाट्ये, रांगोळीच्या माध्यमातून स्वच्छता, पशुधन चिकित्सा व लसीकरण असे कार्यक्रम राबविण्यात आले. यात गावातील व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या शेंद्रिय खतांची निर्मिती करण्याचे मार्गदर्शन, पिकांवरील रोग-किडींचे शेंद्रीय पद्धतीने एकात्मिक व्यवस्थापन, इत्यादीवर मार्गदर्शन ठेवण्यात आले होते. विद्यार्थ्यांच्या बौद्धिक व अभिव्यक्ती विकासासाठी बौद्धिक सत्रामध्ये वेगवेगळ्या तज्ञांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले होते.

यामध्ये व्यक्तिमत्व विकास, कृषी सेवेतील वाटचाल, फोटोग्राफीमधील कौशल्य, योग आणि प्राणायाम यासारख्या विषयांवर मार्गदर्शनपर सत्रे आयोजित करण्यात आली. समारोपीय कार्यक्रमात प्राचार्य डॉ. पोतदार, कार्यक्रम अधिकारी तसेच सरपंच, ग्रामपंचायत सदस्य मंडळ उपस्थित होते. एकंदरीत या आठवडाभर चाललेल्या निवासी शिबिरामुळे शेगांव खुर्द गावाच्या एकोप्याचा आणि सहकार्याचा प्रत्यक्ष अनुभव घेता आला. हे निवासी शिबीर यशास्वीरीत्या पार पडण्यासाठी रा. से. यो. युनिटचे कार्यक्रम अधिकारी डॉ. जोगी यांच्या मार्गदर्शनाखाली इतर शिक्षक डॉ.पातोंड, डॉ.मानकर, सौ.पुसदेकर, डॉ.पाटील, डॉ.पारधी, श्री.बनकर, तसेच शिक्षकेतर कर्मचारी, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक मुख्याध्यापक श्री. मत्ते व शिक्षकगण, ग्रामस्थ यांनी विशेष परिश्रम घेतले.