चिमुकल्याची चिमुकली बँक, देते वित्त व्यवहाराचे धडे दादापुर येथील जि. प. शाळेचा नाविन्यपूर्ण उपक्रम

✒️आम्रपाली गाठले शेगाव बू (Shegaon BK प्रतिनिधी)

शेगाव बू (दि .13 सप्टेंबर) :- येथून जवळच असलेल्या दादापुर येथील जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचा नाविन्यपूर्ण उपक्रम बघून आपल्याला आश्चर्यच वाटेल पन हे सत्य आहे. लहान मुलाचे एक स्वतंत्र जग असेल तर.. कल्पना करा ते जग कसे असेल? त्याचे आचार विचार व्यवहार सारेच कसे असतील? दूरदृष्टी असेल का त्यांच्यात? आलेल्या समस्या ते कसे हाताळतील? आधी अनेक प्रश्न पडलेच असतील. तर पडू दया कारण या जगाची पायाभरणी झालीच आहे…

हा गंमत नव्हे तर वास्तव आहे वरोरा तालुक्यातील दादापुर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी स्वतःची अफलातून बचत बँक उभारली आहे. या बँकेचे संचालक मंडळ म्हणजेच विद्यार्थिच अन गोळी -बेरीज करणारेही विद्यार्थिच आहे. या बँकेला आता 3 वर्षे पूर्ण होत आहे.

*कसा झाला बँकेचा जन्म?*

जि प प्राथ. शाळा दादापूर चे मुख्याध्यापक मा.श्री. निमजे सर व सहाय्यक शिक्षक मा.श्री.हजारे सर यांच्या वैचारिक संकल्पनेतून या शाळेत 12/2/2020 ला विद्यार्थ्यांसाठी अफलातून बचत बँक हा अफलातून उपक्रम सुरु केला. आणि सुरुवातीलाच या उपक्रमाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. सर्व विद्यार्थ्यांनी या बँकेत आपले खाते काढून बचतीची सवय लावून घेतली. परंतु एका महिन्यातच कोरोनामुळे या बँकेचे व्यवहार ठप्प झाले. नंतर जुलै 2022 ला या उपक्रमाला पुनःश्च सुरुवात झाली व विद्यार्थ्यांचा बचतीचा ओघ सुरु झाला.

आज या अफलातून बचत बँकेत वर्ग 1 ली ते 4 थी पर्यंतच्या 46 विदयार्थ्यांचे खाते असून ही बँक आठवड्यातून बुधवार आणि शनिवारी सुरु असते. विद्यार्थिच या बँकेत व्यवस्थापक, रोखपाल, लिपिक, यासारख्या विविध भूमिका बजावतात. तसेच सर्व खातेदारांचे रोख रक्कम जमा करून शाळेतील मु.अ. कडे सर्व हिशोब देतात. या बँकेत सर्व विद्यार्थ्यांकडे पासबुक असून त्यांनी केलेल्या व्यवहाराची नोंद तिथे केली जाते. आज या बँकेत विद्यार्थांच्या खात्यावर एकूण 45000/- रु जमा झाले आहे.

तसेच शाळेत नोटबुक, पेन्सिल यासारखे शैक्षणिक साहित्य विद्यार्थी शाळेतूनच घेत असतात. अर्थात यासाठी त्यांना पालकांना पैसे मागण्याची गरज नसते.. यातूनच स्वावलंबी, हिशोबी, सृजनशील, व्यवहारिक विद्यार्थी घडविण्याचा माणसं जि. प. प्राथमिक शाळा दादापुर करीत आहे.