पोंभूर्णा वन परिसरात पुन्हा वाघ मृतावस्थेत आढळला Tiger found dead again in Pomburna forest area

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर(दि.12 सप्टेंबर) :- मध्य चांदा वन विभाग चंद्रपुर च्या पोंभूर्णा वन परिक्षेत्रातील उप क्षेत्र घोसरी अंतर्गत नियतक्षेत्र नवेगांव भुजला मधील मौजा फिस्कुटी येथील शेत सर्व्हे नंबर २८८ मध्ये वाघ (नर)या वन्य प्राण्याचा मृत्यु झाल्याचे दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ८.३० वाजताच्या दरम्यान आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. 

मुल तालुक्यातील फिस्कुटी येथील एका शेतकऱ्याच्या शेतात मंगळवार दिनांक १२ सप्टेंबर रोजी सकाळी ७.३० वाजताच्या दरम्यान महिला मजुर निंदन करण्याकरीता शेतात गेले असता तिथे त्यांना एक वाघ मृतावस्थेत आढळून आला. मजुरांनी ही माहिती शेत मालकाला दिली. शेत मालकाने फिस्कुटी चे सरपंच नितीन गुरूनुले यांच्या मार्फत शेतात वाघ मृतावस्थेत असल्याची माहिती पोंभूर्णा वन विभागाला दिली.

मध्य चांदा वन विभाग चंद्रपुर च्या उप वनसंरक्षक श्वेता बोड्डू, सहाय्यक वन संरक्षक शेख तोसीफ, पोंभूर्णा वन परिक्षेत्राधिकारी फनिंद्र गादेवार, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाचे प्रतिनिधी बंडू धोतरे, मुख्य वनजीव रक्षक प्रतिनिधी मुकेश भांदककर, तसेच राजोली चे पशू वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर प्रफुलता बशेट्टी, व त्यांची चमू, मुल पशू वैद्यकीय अधिकारी डाॅक्टर संदिप छोनकर, घोसरीचे क्षेत्र सहाय्यक अजय बोधे, नवेगांव भुजला वनरक्षक विनायक कस्तुरे, इत्यादींनी घटनास्थळावर भेंट दिली असता मौका ठिकाणी अंदाजे अडिच वर्ष वयाचा एक अवयस्क वाघ मृतावस्थेत आढळून आला. 

सदर मृत वाघाचे नखे, मिशा, दात इत्यादी अवयव शाबूत असल्याबाबत शहानिशा करण्यात आली. त्यानंतर मृत वाघाला चंद्रपुर च्या ट्रान्झीट ट्रीटमेंट सेंटर येथे शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. मृत वाघाचे पशु वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून शवविच्छेदन करून तिथेच वाघाचे दहन करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच सांगता येणार असल्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी फनिंद्र गादेवार यांनी सांगितले आहे.