शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाण्याची बीज प्रक्रिया करूनच पेरणी करावी Farmers should sow soybean seeds only after seed treatment

136

🔸कृषी विभागाचे आवाहन(Appeal of Agriculture Department)

✒️चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क) 

चंद्रपूर (दि. 3 मे ) :- कृषी उत्पादन वाढीमध्ये बीजप्रक्रिया हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. बियाणे जमिनीत पेरण्यापूर्वी जमिनीतून किंवा बियाणातून पसरणारे विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच बियाण्यांची उगवणक्षमता व रोपे सतेज आणि जोमदार वाढविण्यासाठी बियाण्यावर वेगवेगळी जैविक व रासायनिक औषधांची प्रक्रिया केली जाते.

बीजप्रक्रियेचे फायदे(Advantages of seeding) :- जमिनीतून व बियाण्याद्वारे पसरणाऱ्या रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो. बियाण्याची उगवणक्षमता वाढते. रोपे सतेज व जोमदारपणे वाढतात. पिकाच्या उत्पादनात वाढ होते. बीजप्रक्रियेसाठी कमी खर्च येतो, त्यामुळे ही कीड-रोग नियंत्रणाची किफायतशीर पद्धत आहे.

जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया (Seeding process of bacterial culture) :- नत्र स्थिरीकरणासाठी सोयाबीन गटाचे रायझोबिअम 250 ग्रॅम आणि स्फुरद विरघळवणारे जिवाणू 250 ग्रॅम या जिवाणू संवर्धकाचे पाकिट प्रति 10 किलो सोयाबीन बियाण्यास वापरावे. 1 लिटर गरम पाण्यात 125 ग्रॅम गूळ टाकून द्रावण तयार करावे. सोयाबीन बियाणे ओलसर करून घ्यावे. द्रावण थंड झाल्यावर त्यामध्ये 250 ग्रॅम जिवाणू संवर्धक टाकून बियाण्यास हळुवारपणे लावावे किंवा जिवाणू संवर्धकाचा लेप बियाण्यावर समप्रमाणात बसेल व बियाण्यांचा पृष्ठभाग खराब होणार नाही, याची काळजी घ्यावी. नंतर बियाणे सावलीत स्वच्छ कागदावर सुकवावे. अशा बीजप्रक्रिया केलेल्या बियाण्याची पेरणी ताबडतोब करावी. याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होत नाही.जमिनीतील सेंद्रीय पदार्थ कुजवून जमीन सुधारण्यास मदत होते.

जिवाणू संवर्धक बीजप्रक्रियेबाबतची दक्षता (Vigilance of bacterial growth seeding process) :- जिवाणू संवर्धकाची प्रक्रिया ही बुरशीनाशके किंवा कीटकनाशकांची प्रक्रिया केल्यानंतर करण्यात यावी. जिवाणू संवर्धक लावण्यापूर्वी जर बियाण्यास कीटकनाशके, बुरशीनाशके, जंतुनाशके इ. लावलेले असतील तर जिवाणू संवर्धक नेहमीपेक्षा दीडपट जास्त प्रमाणात लावावे.

जैविक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे (Seed application of biological fungicide) :- सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा वापरावे. ट्रायकोडर्मा ही एक प्रकारची बुरशी असून ती पिकांना हानीकारक नसते. उलटपक्षी बियाण्यांवर वरील रोग पसरविणाऱ्या बुरशींची वाढ न होऊ देता जमिनीमध्ये रोगकारक बुरशींचा नायनाट करून पिकांचे संरक्षण करते. ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया करताना बियाणे स्वच्छ फरशी, प्लॅस्टिक किंवा ताडपत्रीवर पातळ थरात पसरवून ट्रायकोडर्मा ओलसर करून शिंपडावे. नंतर हलक्या हाताने बियाण्यास चोळावे. प्रक्रिया केलेले बियाणे अर्धा तास सावलीत सुकवून पेरणी करावी.

ट्रायकोडर्मा बीजप्रक्रियेबाबतची दक्षता (Precautions regarding Trichoderma seeding process) :- ट्रायकोडर्माचा वापर रासायनिक खतांसोबत किंवा रासायनिक बुरशीनाशकांचा सोबत शक्यतो करू नये. ट्रायकोडर्मा सूर्यप्रकाशापासून दूर, कोरड्या व थंड जागेत साठवावे.

रासायनिक बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया करणे (Seed application of chemical fungicide) :-सोयाबीन पिकावरील अनेक प्रकारच्या बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी प्रति किलो बियाण्यास 3 ग्रॅम थायरम किंवा 2.5 ग्रॅम कार्बेन्डाझिम वापरावे. सोयाबीन बियाणे ओलसर करून घ्यावे. अशी प्रक्रिया करताना हातामध्ये रबरी किंवा प्लॅस्टिकचे हातमोजे वापरावेत. प्रति 10 किलो बियाण्यास 100 मिली पाणी वापरून बुरशी नाशकाचे घट्टसर द्रावण करून ते सोयाबीन बियाण्यास घोळसावे, जेणेकरुन बुरशीनाशक बियाण्यास सारख्या प्रमाणात सहजतेने चिकटेल, त्यानंतर प्रक्रिया केलेले बियाणे सावलीत वाळवून पेरणीसाठी वापरावे.

 शेतकरी बंधूनी सोयाबीन बियाणे बीजप्रक्रीया करूनच बियाणे पेरणी करावी, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात येत आहे.

मुख्य संपादक : मनोज गाठले 

संपर्क : 9767883091