चिमूर विधानसभा क्षेत्रात चालयं तरी काय? What if we run in chimur assembly area?

🔹जनतेला विकास हवा-मनोरंजन नको

✒️ चंद्रपूर (Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.18 मार्च) :-जिल्हयातील चिमुर विधानसभा क्षेत्र हे कुठल्या ना कुठल्या कारणासाठी नेहमीच चर्चेत राहत आले आहे. विकास कामांवर चर्चा झाली तर चिमुरकरांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. मात्र सध्या “आमदार भांगडीया व बुटके” या नाटयमय चर्चेतुन जनतेचे मनोरंजन होत आहे. यामध्ये विकासाच्या चर्चेला विराम मिळत असल्याचे या परिसरातील राजकीय जाणकार बोलत आहेत.

चंद्रपूर जिल्हा कॉंग्रेस कमेटीचे जिल्हा सरचिटणीस गजानन बुटके यांचे लहान भाऊ साईनाथ बुटके यांनी सोशल मिडीयावर आमदार किर्तीकुमार भांगडीया व त्यांचे परिवारावर आपत्तीजक मजकुर प्रसारीत केला असे सांगण्यात येत आहे. साईनाथ बुटके यांनी केलेल्या कृत्याबाबत सर्वच स्तरावरून नाराजी व्यक्त होत आहे. बुटके यांचे समर्थन कुणीही करण्याचे कारणच नाही.

बुटके यांनी जो मजकुर प्रसारीत केला. त्यातून आमदार भांगडीया यांना राग अनावर होणे ही स्वाभाविक वृत्ती आहे. त्यांचे ठिकाणी कुणीही असते तरी तो मजकुर मनाला लागलाच असता. यातूनच आमदार भांगडीया व त्यांच्या कार्यकत्यांनी दिनांक ११ मार्च २०२३ रोजी बुटके यांच्या घरावर जमाव (हल्ला?) केला.

गजानन बुटके यांच्या भावाला भांगडीया यांचे कार्यकर्त्यांनी मारहाण केली, अशी सर्वत्र चर्चा सुरु आहे. ऐवढेच नव्हे तर, साईनाथ बुटके यांच्या पत्नीने आमदार भांगडीया व त्यांच्या कार्यकर्त्यांचे विरोधात चिमुर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केली. त्या तक्रारीनुसार चिमुर पोलीसांनी आमदार भांगडीया व कार्यकत्यांवर विनयभंगासह विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल केले. सोबतच आमदार भांगडीया यांचे तक्रारीवरुन साईनाथ बुटके यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांचे मार्फत चौकशी करुन हे प्रकरण न्यायालयात जाईल. या दोन्ही तक्रारीतील सत्य व तथ्य न्यायालय पुढे आणेल. यात शंकाच नाही. या प्रकरणावर आता पडदा पडेल अशी सर्वसामान्यांची अपेक्षा होती. मात्र सदर प्रकरण अजुनही चर्चेत आहे. काही लोक यातुन राजकारणाचा नफा-तोटा शोधण्याचा प्रयत्न करीत आहेत.

आमदार भांगडीया व त्यांचे समर्थक हे बुटके यांच्या घरावर चालून गेलेत. त्या तारखेपर्यंत बुटके यांनी कोणता मजकुर प्रसारीत केला हे बऱ्याच नागरिकांना माहित नव्हता. हे प्रकरण झाल्यानंतर खऱ्या अर्थाने तो मजकुर जास्त प्रसारीत होवुन सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचला.

दरम्यान माजी आमदार डॉ. अविनाश वारजुकर यांनी या संदर्भात पत्रकार परिषद घेवुन “बहुजनांच्या घरावर लोकप्रतिनधींचा हल्ला” या आशयाचे वृत्त पुढे आणले. डॉ. वारजुकरांनी आमदार भांगडीया यांनी विकासाचे कामे करावीत, गोसेखुर्द प्रकल्पाचे पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवावे असे अनेक सल्ले त्यांनी पत्रकार परिषदेत दिलेत. डॉ. वारजुकरांच्या पत्रकार परिषदेनंतर जनतेमध्ये “विकास हवा… मनोरंजन नको…” या विषयावर चर्चेला प्रारंभ झाला. आणि या प्रकरणाने वेगळेच वळण घेवुन विकास म्हणजे काय ? या विषयावर स्वतंत्र चर्चा सुरु झाल्यात. 

सदर प्रकरण चिमुरचे असले तरी यात चंद्रपूरचे बडे राजकीय पुढारी मात्र विशेष लक्ष ठेवून होते. भांगडीया-बुटके प्रकरण वाढावे अशी त्यांची इच्छा दिसत होती. भाजपाच्या अप्रत्यक्ष मार्गदर्शनातून चंद्रपूरचे काही पत्रकार चिमुरच्या पत्रकारांना प्रकरण वाढविण्याच्या सूचना करीत होते. असो!… हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. या विषयावर कधी काळी स्वतंत्रपणे लिखाण करता येईल.

आम. भांगडीया व बुटके प्रकरणाचा तपास पोलीस करित असतांनाच चिमुर, नागभीड, भिसी, ब्रम्हपूरी, तळोधी (बाळापूर) येथे भारतीय जनता पार्टीचे मुक मोर्चा, निवेदन, बंद आयोजीत करुन “आमदार भांगडीया यांचेवरील गुन्हे मागे घ्या” ही मागणी पुढे करण्यात आली. काही ठिकाणी व्यापार पेठ बंद ठेवण्याचा प्रकार झाला. व्यापारपेठ बंद ठेवणे हे आमदाराचे समर्थन की भितीयुक्त आदर अथवा दबाव हा स्वतंत्र लिखाणाचा विषय आहे. व्यापारपेठ बंद असल्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास झाल्याचे प्रथमदर्शनी दिसुन येत होते.

आमदार भांगडीया यांनी अनेक विकास कामे केलीत. ते विकास कामांसाठी नियोजन करित आहेत. सामान्य नागरिकांना त्यांचे नेहमीचे सहकार्य करणे, कोरोना काळातील आमदार भांगडीया यांचे योगदान, शासकीय निधी मतदार संघात मंजूर करणे हे विषय या प्रकरणामुळे चर्चेच्या मैदानातुन बाहेर पडताना दिसत आहेत. सध्या या नविन चर्चेच्या माध्यमातुन उलटसुलट प्रश्न जनता तयार करीत आहे. भविष्यातील राजकीय गणिताची आकडेवारी जनता मांडत आहे.

दोघांचा वाद हा सार्वजनिक करण्याची काही आवश्यकता नव्हती. लोकप्रतिनिधीचे विरोधात आपत्तीजनक मजकुर प्रसारीत करणे हे समर्थनीय नाही. मात्र लोकप्रतिनिधीचे जवळ कायद्याचे विविध हत्यार उपलब्ध असताना कुणाच्या घरावर जाणे योग्य नसल्याचे जुने-जानते व्यक्ती बोलत आहेत. आम्ही जनतेमध्ये राहतो, त्यामुळे जनतेच्या चर्चा यापुढे सुध्दा चव्हाट्यावर आणत आणत राहु…. तुर्त ऐवढेच….!

शब्दांकन -सुरेश डांगे

संपादक साप्ताहिक पुरोगामी संदेश मो. नं. ८६०५५९२८३०