चिमुर क्रांती जिल्हा झालाच पाहिजे ? हा मुद्दा पुन्हा चर्चेत

176

✒️चंद्रपूर (चंद्रपूर विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चंद्रपूर (दि.20 फेब्रुवारी) :- स्वातंत्र्य चळवळीत महत्वपूर्ण भूमिका बजावणा-या चिमूर शहराला जिल्हा म्हणून घोषीत करावे अशी जुनी मागणी आहे. याकरता चिमुरात अनेक आंदोलने झाली आहेत. अत्यंत चर्चेत असलेले चिमूर जिल्हा आंदोलन गेल्या सात-आठ वर्षापासून अचानक थंड झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. चिमूर शहरात आयोजीत शिवजयंती कार्यक्रमात कांग्रेसचे युवा नेते दिवाकर निकुरे यांनी आपल्या भाषणात चिमूर जिल्हा निर्मितीच्या मागणीला पुढे करून आपली राजकीय पोळी भाजणाऱ्या नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. त्यांच्या या भाषणानंतर चिमूर जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला.

चिमूरचे ऐतीहासिक महत्व व जिल्हा मुख्यालयापासूनचे लांबचे अंतर लक्षात घेवून स्वातंत्र्य संग्राम सैनिक स्मृतीशेष दामोधरराव काळे गुरुजी यांनी सर्वप्रथम चिमूर जिल्हा निर्मितीचा मागणीची मुहुर्तमेढ रोवली. त्यानंतर बहुतेक सर्वच राजकीय पक्ष व सामाजिक संघटनांनी या मागणीला समर्थन देवुन आपआपल्या स्तरावर आंदोलने केली.

माजी मंत्री तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजय वडेट्टीवार यांचा चंद्रपूर जिल्हयातील राजकीय प्रवास “चिमूर जिल्हा” या भावनिक मागणीने झाला आहे. वडेट्टीवार यांनी या क्षेत्रातील राजकीय शुभारंभ करतांना तत्कालीन शिवसेना नेते तथा विद्यमान केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आला.

चिमुर येथील नेहरू विद्यालयाचे मैदानावर नारायण राणे यांनी “तुम्ही मला आमदार द्या, मी तुम्हाला चिमुर जिल्हा देतो” या डरकाळीला चिमुरकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. मात्र बदल्यात चिमूरकरांच्या हातात काय मिळाले? हा स्वतंत्र लिखाणाचा विषय ठरू शकतो. नारायण राणेच्या कोकणी भाषेतील घोषणेचा परिणाम म्हणून विजय वडेट्टीवार हे भरघोस मताने विजयी झालेत. त्यानंतर विजय वडेट्टीवारांनी या मागणी करीता काय केले? याबाबत सविस्तर बोलण्यापेक्षा जनतेला संपूर्ण इतिहास माहित आहे. या ऐतीहासिक घोषणेबाबत आजही चिमुरात उलटसुलट विनोदी चर्चा सुरु आहेत.

चिमूर जिल्हा मागणी करीता तत्कालीन तहसिल कार्यालय जाळपोळ आंदोलन हे संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत आले होते. तत्कालीन आमदार अविनाश वारजूकर यांची भूमिका यावेळी अधोरेखीत झाली होती. तहसिल कार्यालय जाळपोळ प्रकरणात सर्वच राजकीय पक्षाचे काही कार्यकर्त्यांना कारागृहात काही दिवस मुक्काम करावा लागला होता. दरम्यान शिवसेनेचे तत्कालीन तालुका प्रमुख तथा विद्यमान जिल्हा काँग्रेस सरचिटणीस गजानन बुटके यांनी चिमुर तहसिल कार्यालय इमारतीवर “चिमुर जिल्हा कार्यालय” असे फलक लावले होते. या नाविण्यपुर्ण आंदोलनाची चर्चा संपूर्ण महाराष्ट्रात झाली होती.

चिमुर विधानसभा क्षेत्राचे आमदार बंटी भांगडीया यांनी वेळी चिमुर जिल्हा निर्मितीचे आपण समर्थक असल्याचे सांगितले आहे. चिमूर विधानसभा क्षेत्रातील नागभीड येथील जनता सुध्दा नागगीड जिल्हयाची मागणी करीत आहेत. मागील विधानसभा निवडणुकीत आमदार बंटी भांगडीया यांना नागभीड जिल्हयाबाबत आपली भूमिका स्पष्ट करा. असा प्रश्न केला होता.तेव्हा त्यांनी आपण मला मते दिली नाही तरी चालेल मात्र मी चिमुर जिल्हा घोषीत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी चिमूरकरांसाठी दिलदार गर्जना केली होती.

निवडणूक प्रचारात एवढे स्पष्ट बोलण्याची हिंमत दाखविणे हे साधे-सोपे काम नव्हते. चिमुर जिल्हा निर्मितीकरीता आवश्यक ते प्रशासकीय रचना करणे आवश्यक असून त्याकरीता चिमुर अतिरिक्त जिल्हा, भिसी अतिरिक्त तालुका कांगा- चिमुर-वरोरा रेल्वे मार्ग, गोसेखुर्दचे पाणी यासारखे पूरक कामे आवश्यक असल्याचे आमदार बंटी भांगडीया यांनी वेळोवेळी सांगितले आहे.

आता चिमूर जिल्हा निर्मितीचा मुद्दा काँग्रेसचे दिवाकर नेते यांनी शिवजयंती पवित्र दिवशी पुढे केला आहे. त्यांना या क्षेत्रात आपले राजकीय हाथ-पाय घट्ट रोवायचे असतील तर त्यांनी “चिमूर जिल्हा निर्मितीची भूमिका” या विषयावर जनतेच्या दरबारात भुमिका स्पष्ट करावी. सोबतच चिमुर जिल्हा आंदोलनाच्या वाटचालीची “ब्लूप्रिंट” जनतेपुढे सादर करावी अशी अपेक्षा बाळगणे व्यर्थ ठरु नये, तूर्त एवढेच…..पुढे सविस्तर लिहिता येईल.

 

सुरेश डांगे, संपादक

पुरोगामी संदेश,

मो. नं. ८६०५५९२८३०