बौद्ध अधिकाऱ्यांना टारगेट केल्यास देणार चोप-तेढ करून बार्टीला बंद करण्याचा जातीयवाद्यांचा घाट

🔸आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे अध्यक्ष आर. एल. नंदागवळी यांचा आरोप

✒️ नागपूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

नागपूर(दि.17 फेब्रुवारी) :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमध्ये आतापर्यंत दोन बौद्ध समाजाचे महासंचालक आले. मात्र, त्यातील एका अधिकाऱ्याला फक्त दीड वर्षाचा कालावधी मिळाला. आताचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनाही फक्त अडीच वर्षे झालीत. बौद्ध अधिकाऱ्यांचा कार्यकाळ पूर्ण करू न देता त्यांना बदनाम करून पदावरून काढण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या जातीयवाद्यांचा गट सक्रिय आहे. यापुढे हे सहन केल्या जाणार नाही. कोणतीही जातीवादी संघटना असली तिला ठेचून काढून, असा इशारा आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर,एल. नंदागवळी यांनी केला आहे. त्याप्रमाणे त्यांनी सरकारलाही अल्टिमेटम दिला आहे. 

            राज्य शासन बौद्ध विरोधी असल्याचे दिसून येत आहे. राजकारणात बौद्धांना टारगेट करून राजकीय पक्ष बौद्ध उमेदवारांचा निवडणूक गेम करतात. प्रशासनामध्येही अधिकाऱ्यांना त्रास देण्याचा तोच प्रकार सुरू आहे. गेल्या अनेक वर्षांपासून असा घाणेरडा आणि गलिच्छ प्रकार सुरू आहे. बौद्ध अधिकाऱ्यांची पदावर नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्याविरोधात कटकारस्थान करण्याचे काम काही जातीयवादी संघटनांकडून होत आहे. पुणे येथील बार्टीच्या मुख्यालयात तोच गलिच्छ प्रकार सुरू आहे. महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्याविरोधात काही अनुसूचित जातींमधीलच जातीवादी संघटनांनी त्रास देण्याचा काम सुरू केले आहे. बार्टीमध्ये बैठका घेऊन कटकारस्थान रचत आहेत. बार्टी झाल्यापासून फक्त दोन बौद्ध अधिकारी बार्टीला मिळाले आहेत. मात्र, त्यांचा कार्यकाळ पूर्ण न होताच बदनाम करून पदमुक्त करण्याचा घाट सरकारकडून होत आहे. काही वर्षापूर्वी महासंचालक म्हणून ढाबरे नावाचे अधिकारी रुजू झाले. मात्र, त्यांच्याविरोधात जातीयवादी संघटनांनी एकत्र येऊन विरोध करणे सुरू केले. त्यांनाही फक्त दीड वर्षांपेक्षा कमी कालवधीत पदमुक्त करण्यात आले. त्यानंतर बौद्धत्तेर अधिकारी आले.

मात्र, दोघांनाही आपला कार्यकाळ पूर्ण केला. २०२० मध्ये धम्मज्योती गजभिये यांची महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांनी अनुसूचित जातींमधील सर्व जातींचा सर्वसमावेश विकास करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यासाठी विविध योजनाही सुरू केल्यात. मात्र, त्यांच्याविरोधात कटकारस्थान करून बदनाम करण्याचा प्रयत्न केला. श्री. गजभिये यांनी बार्टीतील गैरव्यवहार चव्हाट्यावर आणला. अनेक बोगस प्रशिक्षण केंद्र बंद करून त्यांच्यावर कारवाई केली. तसेच यात गैरव्यवहार करणाऱ्या अधिकाऱ्यांनाही पदमुक्त करून पारदर्शकता आणण्याचा प्रयत्न केला. हे करीत असताना आमच्या जातीच्या अधिकाऱ्यावर कार्यवाही केली म्हणून बोंबा ठोकणारी जातीयवादी संघटना सक्रिय झाली. बार्टीच्या कार्यालयातच महासंचालकाविरुद्ध कट करून आंदोलन सुरू केले. भ्रष्ट अधिकाऱ्यांना पाठिशी घालणाऱ्या अशा संघटनांना यानंतर चोप दिला जाणार आहे.

अधिकारी कोणत्याही समाजाचा असो चांगले काम करीत असेल तर त्याचा सहकार्य केले पाहिजे आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांविरोधात सर्व जातींनी आवाज उठविला पाहिजे, असेही नंदागवळी म्हणाले. फक्त बौद्ध समाजाचा अधिकारी आहे म्हणून सूडबुद्धीने जातीयवादी संघटना वागत असतील तर बौद्ध समाज गप्प बसणार नाही, असा इशाराही आर.एल. नंदागवळी यांनी दिला.

     आरक्षणाची लढाई बौद्ध लढणार आणि मलिदा दुसरेच       खाणार

                            आत्तापर्यंत आरक्षणाची लढाई बौद्ध समाजाने लढली आहे. अनुसूचित जाती, जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाची लढाई बौद्ध समाजाने लढली आहे. प्रत्येक आंदोलनात समाजाने पुढाकार घेतला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या विराचारांनी हा पुढे जात आहे. काबाडकष्ट करून समाज शिक्षण घेत आहे.

कर्मकांडांच्या पगड्यात आयुष्य काढणारा समाज फक्त बौद्धांना आरक्षण लाटले म्हणून बोंबा मारीत आहेत. बाबासाहेबांच्या विचारांने शिक्षण घेऊन बरोबरी करण्याचा प्रयत्न केल्यास आनंदाने त्यांचा स्वीकार करू.मात्र, सूडबुद्धीने बौद्ध समाजातील अधिकाऱ्यांचा विरोध केल्याच चोप दिल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही आंबेडकरवादी संघर्ष पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आर. एल. नंदागवळी यांनी दिला आहे.

निबंधकांची विभागीय चौकशी न केल्यास मंत्रालयासमोर आंदोलन

                 डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेमधील निबंधक श्रीमती इंदिरा अस्वार यांची विभागीय चौकशी करावी म्हणून महासंचालकाने सामाजिक न्याय विभागाला पत्र दिले आहे. त्या पत्रावर कार्यवाही करून निबंधकांची चौकशी न केल्यास मंत्रालयासमोर आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही आर. एल. नंदागवळी, पुंडलिक घ्यार आणि शेकडो पदाधिकाऱ्यांनी दिला आहे.