शासनाने त्या गावातील एका पिढीचे नुकसान केले :- ऍड.पुरुषोत्तम सातपुते

🔸निप्पान डेंड्रो प्रकल्पाकरीता संपादित झालेल्या जमिनधारकांसह उपविभागीय अधिकारी सोबत सभा संपन्न

🔹पिडीत शेतकरी आक्रमक

✒️ मनोज कसारे (वाघेडा प्रतिनिधी)

वाघेडा (दि.26 डिसेंबर) :- भद्रावती तालुक्यातील मौजा विजासन, रुयाड (रिठ), पिपरी (देश.), टोला, चारगांव, लोणार (रिठ) तेलवासा, कुणाडा, चिरादेवी व ढोरवासा या गावातील बाराशे हेक्टर जमीन निप्पान डेंड्रो प्रकल्पाकरीता अधिग्रहन संपादित झालेल्या जमिनधारकांशी विरोधाची कारणे समजून घेण्यासाठी संबंधीत भूधारकांची (दि.24) रोजी सकाळी 11.00 वाजता उप विभागीय अधिकारी कार्यालय, वरोरा येथे सभा संपन्न झाली.

या गावातील भुधारकांची शेती निप्पान डेंड्रो प्रकल्पाकरीता अधिग्रहन करून २८ वर्षे झालेली आहेत. तरी भुधारकांना कोणत्याही प्रकारचा फायदा झालेला नाही. तरी सदर बैठकीत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे भुधारकांनी निवेदन देवून त्यात मागण्या ठेवल्या आहेत.

यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ पुरुषोत्तम सातपुते यांनी शेतकऱ्यांची बाजू मांडली. व तेथील उपस्थित एम.आय.डी.सी. अधिकाऱ्यांची झाडाझडती घेतली. या सर्व प्रकारात त्या गावातील एका पिढीचे नुकसान केल्याचा आरोप एड. सातपुते यांनी केला.

निवेदनात प्रति ७/१२, एक नौकरी किंवा नौकरीचे पॅकेज २५ लाख रूपये देण्यात यावे, समजा जो शेतकरी नौकरी करण्यास ईच्छुक नसेल त्याला नौकरीचे पॅकेज २५ लाख रूपये देण्यात यावे, जमिनीचा आजचा बाजार भाव प्रमाणे सर्व शेतक-यांना रक्कम देण्यात यावी, समजा ज्या शेतक-यांच्या मुलांचे वय कमी असल्यास त्याला १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर नौकरीमध्ये समाविष्ट करण्यात यावे, प्रत्येक शेतक-यांच्या मुलाला नौकरी दिल्यानंतर त्याचा योग्य पगार ठरविण्यात यावा, शेतक-यांच्या कुटूंबातील सर्व सदस्यांच्या आरोग्याची हमी घ्यावी लागणार, नौकरी केव्हा देणार आहे याची हमी द्यावी, प्रत्येक शेतक-याला किंवा शेतक-यांच्या मुलांना त्याच्या शैक्षणिक पात्रतेनुसार नौकरी देण्यात यावी, शेती गेलेल्या शेतक-यांना व त्यांच्या मुलांना नौकरीकरिता प्रथम प्राधान्य देण्यात यावे.

या प्रकल्पाअंतर्गत कोणकोणते गाव दत्तक घेण्यात येणार आहे याची सर्व माहिती देण्यात यावी, गावातील शुध्द पाणी, विज, रोडची व्यवस्था देण्यात यावी, कंपनीचे वॉल कंपाउंड करीत असतानी २० फुट जागा सोडून वॉल कंपाउंड करावे, शेतक-यांचे रस्ते बंद होत असल्यामुळे वॉल कंपाउंडच्या २० फुट सोडलेल्या जागेतून शेतकरी येणे जाणे करतात, कंपनी तर्फे शेतक-यांकरीता शेतकरी भवन बांधून देण्यात यावे.

दत्तक घेतलेल्या गावामध्ये बांधून देण्यात यावे, आमच्या शेती कंपनीत गेल्याला २८ वर्षे पूर्ण झाले असल्यामुळे त्या जमिनीवर आमचा ताबा आहे. व उत्पन्न घेत आहे. तरी वरील अटी मान्य नसतील तर आमच्या सर्वांच्या जमिनी आम्हांला परत देण्यात यावे.यावेळी ज्येष्ठ विधीज्ञ ऍड. पी.एम. सातपुते, वासुदेव ठाकरे, सुधीर सातपुते, मधुकर रा. सावनकर, सुरेश बदखल, बाळकृष्ण गानफाळे, प्रवीण सातपुते, उमाकांत गुंडावार, संतोष नागपुरे, विनोद उपरे आदी उपस्थित होते.

“अठ्ठावीस वर्षापासून रखडलेल्या निप्पॉन डेन्ड्रो प्रकल्पाकरीता संपादित केलेल्या बाराशे हेक्टर जमिनी संदर्भात शासन व प्रशासनाने आपली भुमिका स्पष्ट करावी. तथा नवीन प्रकल्प उभारल्या जात नसल्यास शेतकऱ्यांच्या जमिनी तात्काळ परत करा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते रविंद्र शिंदे यांनी नुकतीच शासनाकडे केलेली होती, हे विशेष”