भांब शिवारात आढळला बिबट्याचा मृतदेह

🔹बिबट्याचा मृत्यू कशामुळे? वनविभागाकडे शोधण्याचे आव्हान

✒️शाम बेलगमवार महागाव(Mahagaon तालुका प्रतिनिधी)

महागाव(दि.19 मे) :-

जंगल भागात दोन दिवसांपूर्वी बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेत मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. या बिबट्याचा नेमका मृत्यु कशामुळे झाला? हे शोधण्याचे वनविभागा समोर तगडे आव्हान उभे ठाकले आहे.

महागांव वनपरिक्षेत्र कार्यालयांतर्गत येणाऱ्या भांब शिवारात दोन दिवसापूर्वी जनावरे चरणाऱ्या इसमांना दुर्गंधीचा वास आल्याने त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता त्या ठिकाणी मृत्यु झालेल्या बिबट्याचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला. अंदाजे सात ते आठ दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे.

या संदर्भातील माहिती वनविभागाला मिळताच वनपरिक्षेत्र अधिकारी देवेंद्र मुनेश्वर,वनपाल रविंद्र जाधव यांच्या सह वनरक्षकांनी घटना स्थळी भेट देऊन पाहणी केली. याबाबत वरिष्ठांना माहिती दिली.त्या नुसार डीएफओ शशांक कदम, एसिएफ ढगळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पशु वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलावून त्यांच्या कडून सदर मृत बिबट्याचे शवविच्छेदन करून घेतले. वनविभागाच्या अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांना या बिबट्याच्या मृत्यूचे कारण शोधण्याचे आदेश दिले आहेत.या बिबट्याचा मृत्यु नेमका कशामुळे झाला? याचा शोध घेण्याचे मोठे आवाहन वनविभागासमोर उभे राहिले आहे. या बिबट्याचा वाढत्या तापमानाचा परिणाम होवुन उष्माघाताने मृत्यु झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.