आपल्या न्याय मागण्यासाठी उद्या महागावात औषधी दुकाने बंद राहणार

✒️श्याम बेलगामवार महागाव(Mahagaon तालुका प्रतिनिधी)

महागाव(दि.19 मे) :-

अखिल भारतीय औषधी विक्रेता संघटना (एआयओसीडी) यांच्या आव्हाना नुसार 20 मे 2026 रोजी महागांव तालुक्यांतील औषधी विक्रेत्यांची दुकाने पूर्णतः बंद पाळण्याचा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात महागाव तालुका औषधी विक्रेता संघटनेने महागाव तहसीलदार यांना निवेदन सादर केले. निवेदनात ऑनलाईन औषधी विक्री इंटरनेट फार्मसी पोर्टलद्वारे होणारी औषधी विक्री तसेच केंद्र शासनाच्या काही अधिसूचनेवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

 शासन व प्रशासनाने या विषयावर सकारात्मक भूमिका घेतली नसल्यामुळे देशव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आल्याचे संघटनेने स्पष्ट केले. महाराष्ट्रासह यवतमाळ जिल्ह्यातील औषध विक्रेते या बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच अत्यावश्यक वैद्यकीय सेवा आवश्यक असल्यास महागांव तालुका औषधी विक्रेता संघटनेचे पदाधिकारी सहकार्य करतील असेही स्पष्ट करण्यात आले. या निवेदनाच्या प्रती पोलीस निरीक्षक महागाव पोलीस स्टेशन तसेच ग्रामीण रुग्णालय महागाव यांना देण्यात आल्या आहेत.

सदर निवेदनातून संघटनेने देशातील बनावट औषधाचा सुळसुळाट थांबून ग्राहकाची आरोग्य विषयक लुट थांबून ऑनलाइन विक्रीला लगाम लावावा, औषध क्षेत्राचे नुकसान करणारी आणि आरोग्याला घातक ठरणारी ऑनलाइन विक्री पूर्णतः बंद करण्यात व्हावी. कार्पोरेट डिस्काउंट बंद करण्यात यावा. कार्पोरेटद्वारे छोट्या व्यवसायिकांना संपाविण्यासाठी दिल्या जाणारा अवाजवी डिस्काउंट बंद व्हावा. जीएसआर 817 कायदा पूर्णतः बंद करण्यात यावा.औषध विक्रेत्यावर अन्याय करणारा जीएसआर 817 हा जाचक कायदा केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावा, अशा प्रकारच्या मागण्याचे निवेदन औषधी विक्री संघटनेकडून सादर करण्यात आले.