✒️सौ. सुवर्णा बेले राजुरा (Rajura प्रतिनिधी)
राजुरा(दि.27 नोव्हेंबर) :-
ॲड.यादवराव धोटे मेमोरियल सोसायटी, राजुरा द्वारा संचालित ॲड. यादवराव धोटे महाविद्यालयात भारतीय संविधान दिन उत्साहपूर्वक व विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. दिवसाची सुरुवात भारतीय संविधानावर आधारित हस्ताक्षर स्पर्धेने झाली.या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला संविधानातील मूल्ये सुंदर हस्ताक्षरातून मांडण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी केला.यानंतर संविधान जनजागृतीसाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले.
रॅलीची सुरुवात महाविद्यालयापासून संविधान चौक येथून झाली व नेहरू चौक मार्गे नेऊन महाविद्यालयात सांगता झाली. या रॅलीचा उद्देश विद्यार्थ्यांनी घोषणाबाजी करत संविधानाची महत्त्वाची तत्त्वे जनमानसापर्यंत पोहोचणे हा होता.यानंतर महाविद्यालयात आयोजित समारंभाची सुरुवात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे महत्त्व सांगून उद्देशिका वाचन घेण्यात आले. याच वेळी एक भावनिक कळ म्हणजे 26/11 चा मुंबई दहशतवादी हल्ला यामध्ये पोलिसांना हादरवून टाकणाऱ्या दहशतवादी हल्ल्याची आठवण विद्यार्थ्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने जपली व शहिदांना अभिवादन करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
तसेच सांस्कृतिक विभागातर्फे संविधान विषयक प्रश्नमंजुषा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग दाखवत ज्ञान विनिमय वाढवला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या मीनाक्षी कालेश्वरवार, महाविद्यालयाचे पर्यवेक्षक इर्शाद शेख सर्व विभाग प्रमुख तसेच प्राध्यापकवृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अविस्मरणीय क्षणांचे उत्कृष्ट सूत्रसंचालन वर्ग 11वी वाणिज्य शाखेच्या विद्यार्थिनी श्वेता साह,लेखरानी लोहे यांनी केले तसेच उद्देशिका वाचन ऐश्वर्या साठोणे हिने केले कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने झाली.







