✒️शेख रफिक माहूर (Mahur विभागीय प्रतिनिधी)
माहूर(दि.29 ऑक्टोबर) :-
येथील बळीराम पाटील मिशन मांडवी संचलित श्री रेणुकादेवी कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांची ‘इंद्रधनुष्य २०२५’ या आंतरविद्यापीठ राज्यस्तरीय युवक महोत्सवाच्या प्रशिक्षण शिबिरासाठी निवड झाली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२५-२६ या कालावधीत आयोजित ‘इंद्रधनुष्य २०२५’ राज्यस्तरीय आंतरविद्यापीठ युवक महोत्सव दि. ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव येथे होणार आहे. या महोत्सवासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथील विद्यार्थी संघ सहभागी होणार असून, त्यासाठी दि. ३१ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबर २०२५ या कालावधीत निवासी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षण शिबिरासाठी श्री रेणुकादेवी महाविद्यालयातील पंकज ओंकार मेश्राम, विकेश विजय तोडसाम यांची निवड झाली आहे. नुकत्याच नांदेड येथे संपन्न झालेल्या युवक महोत्सवासात महाविद्यालयाने सादर केलेल्या आदिवासी नृत्यास तिसरा क्रमांक मिळाला. या संघात दोन्ही विद्यार्थ्यांचा समावेश होता हे विशेष. विद्यार्थ्यांची ही निवड केवळ प्रशिक्षण शिबिरासाठी असून, त्यानंतर त्यांची अंतिम निवड राज्यस्तरीय युवक महोत्सवासाठी करण्यात येणार आहे.
विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रफुल्लजी राठोड, सचिव सौ संध्याताई राठोड, उपाध्यक्ष किशोरजी जगत, कोषाध्यक्षा नेहाताई राठोड, सहसचिव नकुलजी राठोड, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ .विलास पाटील,प्राध्यापकवर्ग , शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.







