महागाव उमरखेड विधानसभा क्षेत्राचे नेमके आमदार कोण

🔹नितीन भुतडा की किशन वानखेडे मतदार संघातील जनतेमध्ये संभ्रम

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.7 मार्च) :- 

 नगरपंचायत महागाव येथील नगराध्यक्ष कडून 25 ऑगस्ट 2023 पासून विशेष समिती संदर्भातील एका शासकीय पत्रामुळे सध्या तालुक्यात चर्चेचे वातावरण निर्माण झाले आहे. नगररचना विभागाच्या कार्यक्षम अधिकारी शिल्पा कवळे यांनी 24 सप्टेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना पत्र पाठवून महागाव नगरपंचायतीच्या काही मुद्द्यांवर चौकशी करून वस्तुस्थिती दर्शक अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. सदर पत्रावर विधानसभा सदस्य म्हणून दोन व्यक्तींचा नामोल्लेख झाल्याने मतदार संघातील सुज्ञ नागरिक कमालीचे संभ्रमात पडले आहेत.

    नगर विकास विभागाच्या या पत्रात नमूद केल्याप्रमाणे, 25 ऑगस्ट 2023 पासून नगराध्यक्षांच्या कार्यकाळात झालेल्या कथित गैरव्यवहारा बाबत विशेष समिती स्थापन करून कार्यवाही करावी, अशा आशयाचे पत्र काढण्यात आले. या संदर्भात 9 सप्टेंबर 2025 रोजी मुख्यमंत्री यांना पाठवलेल्या पत्राची प्रत जोडण्यात आली असून त्या पत्रावर आमदार इंजिनीयर किसन वानखेडे तसेच “विधानसभेचे सदस्य नितीन भुतडा” असा उल्लेख करण्यात आला आहे.

मात्र या पत्रातील “विधानसभेचे सदस्य नितीन भुतडा” हा उल्लेखच सध्या महागाव नगरपंचायत परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. नितीन भुतडा हे नेमके कोणत्या मतदारसंघाचे विधानसभा सदस्य आहेत?असा प्रश्न नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.शासकीय पत्रात असा उल्लेख होतोच कसा ? संबंधित अधिकाऱ्यांनी त्याची पडताळणी केली होती का? तसेच अशा संदिग्ध पत्राच्या आधारे चौकशी प्रक्रिया सुरू करणे कितपत योग्य आहे? असे कित्येक प्रश्न मतदार संघातील नागरिकांना संभ्रमात टाकत आहेत.

दरम्यान, या पत्राची प्रत आमच्या प्रतिनिधीच्या हाती लागल्याने ही बाब समोर आली आहे. या प्रकरणात प्रशासनाने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी समोर आली आहे.

महागाव नगरपंचायत मधील कथित गैरव्यवहाराच्या चौकशी सोबतच पत्रातील या उल्लेखामुळे प्रशासनाच्या प्रशासकीय कामकाजावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याने विधानसभा क्षेत्राचे नेमके आमदार कोण? या संदर्भात तालुक्यांत चर्चेला उद्यान आले आहे.