🔸प्रत्येकी दहा लाख रुपये पंधरा दिवसाच्या आत भरण्याची निर्देश
✒️विश्वनाथ महामुने महागाव(Mahagaon विभागीय प्रतिनिधी)
महागाव(दि.2 मार्च) :-
बाबासाहेब नाईक कापूस उत्पादक सहकारी सूतगिरणी पिंपळगाव (कान्हा) या संस्थेच्या अध्यक्षांसह विस संचालक मंडळाला धनादेश अनादर (चेक बाऊन्स) प्रकरणी नोटिसा बजावण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे.सदर सूतगिरणी ही कृष्णा फायबर्स (जि. अकोला) यांना भागीदारी तत्त्वावर देण्यात आली. 31डिसेंबर 2024 रोजी झालेल्या करारा नुसार व्याजापोटी ठेव म्हणून पन्नास लाख रुपये व करारांतर्गत 1कोटी रुपये अशी एकूण दीड कोटी रुपयांची रक्कम प्राप्त झाली होती. या रकमेसाठी प्रत्येक संचालका कडून 10 लाख रुपयांचे सात धनादेश देण्यात आल्याची माहिती आहे. धनादेश अनादर झाल्याने नोटीसा जारी करण्यात आल्या, यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
या पैकी 10 लाख रुपयांचा एक धनादेश Union Bank of India शाखा पुसद येथून 31 डिसेंबर 2025 रोजी काढण्यात आला. तो 29 जानेवारी 2026 रोजी State Bank of India शाखा अकोट येथे वटविण्या साठी बँकेत जमा करण्यात आला. मात्र खात्यात पुरेशी शिल्लक नसल्याने सदर धनादेश अनादरीत (डिशॉनर) झाला. सूतगिरणीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकासह एकूण 20 संचालकांना गुरुवारी 26 फेब्रुवारी 2026 रोजी नोटिसा जारी करण्यात आल्या. प्रत्येकी 10 लाख रुपये 15 दिवसांच्या आत भरण्याचे निर्देश देण्यात आले.अन्यथा Negotiable Instruments Act च्या कलम 138 अंतर्गत कायदेशीर कार्यवाहीचा इशारा देण्यात आला आहे.
उच्च न्यायालयाचे अधिवक्ता आर.बी. अग्रवाल यांच्या मार्फत नोटिस बजावण्यात आल्याचे समजते. बाबासाहेब नाईक सुतगिरणीचे अध्यक्ष शामराव भाऊराव पाटील, व्यवस्थापकीय संचालक एम. आय.पात्री यांच्यासह अन्य विस संचालकांना ह्या नोटीसा प्राप्त झाल्या नंतर सूतगिरणीच्या संचालक मंडळात एकच खळबळ उडाली आहे.
दरम्यान,संबंधित संचालक मंडळा कडून या प्रकरणी अधिकृत भूमिका जाहीर करण्यात आलेली नसून, पुढील कायदेशीर घडामोडी कडे महागाव तालुक्यांचे लक्ष लागले आहे.







