🔹जखमी महिलांना तातडीची मदत व शेतकरी,शेतमजुरांना संरक्षण द्या;महेश नाईक
✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय)
महागाव (दि.29 डिसेंबर) :-
उमरखेड तालुक्यांतील टाकळी शिवारात शेतात काम करत असतांना दोन शेतमजूर महिलांवर रानडुकराने अचानक हल्ला केल्याची गंभीर घटना १३ डिसेंबर रोजी घडली. या हल्ल्यात सोनाबाई लक्ष्मण मुकाडे व वंदना परसराम अंभोरे रा.फुलसावंगी या महिला गंभीर जखमी झाल्या आहेत.
शेतात रोजमजुरी करत असताना दबा धरून बसलेल्या रानडुकराने अचानक हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. प्रसंगावधान राखल्यामुळे मोठी जीवितहानी टळली असली तरी दोन्ही महिलांना गंभीर दुखापत झाली. घटनेनंतर तातडीने उपचार करण्यात आले.
दरम्यान, घटनेनंतर अनेक दिवस उलटूनही वन विभागाकडून कोणतीही ठोस मदत अथवा नुकसानभरपाई मिळालेली नसल्याने शेतकरी व शेतमजुरांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.
जखमी महिलांची भेट घेऊन भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेश नाईक यांनी सांत्वन केले व वन विभागाच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
महेश नाईक म्हणाले,
“शेतकरी आणि शेतमजूर हे रोज जीव धोक्यात घालून शेतात काम करतात. रानडुकरांचा उपद्रव वाढत असताना वन विभाग केवळ कागदोपत्री कारवाई करत आहे. जखमी महिलांना तातडीने नुकसानभरपाई व आर्थिक मदत दिली नाही, तर शेतकरी व शेतमजुरांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडले जाईल.”
या परिसरात रानडुकरांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत असून यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत. त्यामुळे वन विभागाने तातडीने बंदोबस्ताची ठोस उपाययोजना करावी, शेतकऱ्यांना संरक्षण द्यावे व हल्ल्यात जखमी झालेल्यांना विलंब न लावता मदत द्यावी, अशी जोरदार मागणी होत आहे.







