✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर(दि.19 ऑक्टोबर) :- चिमुर मतदार संघामध्ये विधानसभा निवडणूकी करिता चिमुर निवडणूक प्रशासन सज्ज झाले आहे.दिनांक 20 नोव्हेंबर रोजी (बुधवार) होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 करिता 74- चिमुर मतदार संघामध्ये संपूर्ण निवडणूक प्रशासन सज्य झालेले आहे. चिमुर विधानसभा मतदार संघात एकुण मतदार 279907 असून यात पुरुष मतदार 140787 तर महिला मतदार 139120, नव युवक मतदार 7047आहेत, दिव्यांग (PWD ) मतदार 1285, जेष्ठ नागरीक मतदार (85+) 1891असून हे मतदार 314 मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती चिमूर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी दिली.
महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक – 2024 च्या अनुषंगाने उपविभागीय कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी तहसीलदार श्रीधर राजमाने, नायब तहसीलदार निकुरे उपस्थित होते.
निवडणूक आयोगाच्या निर्देशनुसार विशेष मतदान केंद्र स्थापन करण्यात येत असून त्यामध्ये 1 युवा मतदान केंद्र, 1 सर्व महिला बुथ आणि 1 दिव्यांग मतदान केंद्र यांचा अंतर्भाव आहे. निवडणूक निर्णय अधिकारी चिमुर विधानसभा मतदारसंघ यांचे कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर नियंत्रण कक्ष 24 बाय 7 असणार आहे. तसेच Cvigil App व्दारे सुध्दा नागरीकाना तक्रारीकरीता सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करून मतदान टक्केवारी वाढविण्याचे दृष्टीकोणातुन तसेच युवा मतदार, महिला मतदार यांचे मतदान वाढावे याकरिता मतदार जनजागृती अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले आहेत.
तसेच मतदार केंद्रावरती मतदारांकरिता आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून प्रत्येक मतदानकेंद्रावर आरोग्य पथक तसेच मतदार सहायता कक्ष स्थापीत करण्यात येणार आहे. दिव्यांग व वयोवृध्द मतदारांना मतदान केंद्रात जाण्याकरिता व्हिलचेअर तसेच त्यांना मदत करण्याकरिता स्वयंसेवक यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. वयोवृध्द मतदारांना (85+) व दिव्यांग मतदारांना त्यांच्या मतदानाचा हक्क बजावणे सुलभ व्हावे याकरिता घरोघरी मतदानाची (Home Voting) ची सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे घाडगे यांनी सांगितले.
उमेदवारास निवडणूक कालावधीत जास्तीत जास्त 40 लक्ष रुपये खर्चाची मर्यादा राखणे बंधनकारक आहे. निवडणूक कालावधीत दैनंदिन झालेल्या खर्चाचा हिशोब दररोज देणे आवश्यक असून निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसांच्या आत संपूर्ण खर्चाचा हिशोब शपथपत्रासह सादर करणे बंधनकारक आहे.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूककरिता इच्छुक उमेदवारास नाम निर्देशन पत्र (नमुना ब) व त्यासोबत शपथपत्र (नमुना 26) परिपूर्ण भरून देणे अनिवार्य आहे. एका उमेदवारास जास्तीत जास्त चार नामनिर्देशन पत्र सादर करता येईल. सर्वसाधारण उमेदवारास नामनिर्देशन पत्रासोबत 10 हजार रुपये रोख आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवारास 5 हजार रुपये रोख जमा करणे बंधनकारक आहे.
मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याकरिता स्वयंस्फूर्तीने सहभाग नोंदवावा तसेच लग्न समारंभ व इतर सण समारंभाप्रमाणेच लोकशाहिच्या या महोत्सवात सर्व मतदारांनी सामील होऊन आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडावे असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी 74-चिमुर विधानसभा मतदार संघ तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांनी केले.






