वाघाच्या हल्ल्यात गाय ठार, मांगली येथील घटना

✒️ मनोज कसारे भद्रावती(Bhadrawati प्रतिनिधी)

भद्रावती(दि.25 ऑक्टोबर) :- गुरे चारण्यासाठी गेलेल्या एका गुराख्याच्या गाईच्या कळपातील एका गाईवर वाघाने हल्ला करून तिला जागीच ठार केले. सदर घटना दिनांक 23 रोज सोमवारला तालुक्यातील मांगली गावाजवळील नवरगाव रिठातील जंगल शिवारात घडली.

सदर गाय हि गाभण होती. या गाईच्या मृत्यूमुळे गाय मालकाचे 65 हजार रुपयांचे नुकसान झाले. मांगली येथील गुराखी नेहमीप्रमाणे घटनेच्या दिवशी गायींना चारण्यासाठी सदर शिवारात घेऊन गेला होता. गाई चरत असताना दुपारच्या वेळी दबा धरून असलेल्या वाघाने विनोद पायघन यांच्या गाईवर हल्ला केला. यात सदर गाईचा जागीच मृत्यू झाला.

सदर गाय ही गाभण असल्यामुळे विनोद पायघन यांचे 65 हजार रुपयांचे नुकसान झाले. घटनेची माहिती भद्रावती वनपरिक्षेत्र कार्यालयाला कळविण्यात आल्यानंतर वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी येऊन घटनेचा पंचनामा केला. सदर गाईच्या मृत्युमुळे शेतकऱ्याचे आर्थिक नुकसान झाले. त्याची नुकसान भरपाई त्वरित द्यावी अशी मागणी विनोद पायघन यांनी केली आहे.