राज्यात बांबू उत्पादन वाढ आणि त्याआधारित उद्योगाला प्रोत्साहन देणार …ना. सुधीर मुनगंटीवार Increase in bamboo production in the state and promote the industry based on it. Sudhir Mungantiwar

▫️नागपुरातील बांबू “ऊती” टिश्यू कल्चर केंद्राचे ना. मुनगंटीवार यांच्या हस्ते उदघाटन(Bamboo “Ooty” Tissue Culture Center in Nagpur inaugurated by Mungantiwar)

▫️बांबू विकास मंडळाच्या बैठकीत घेतला सविस्तर आढावा( A detailed review was taken in the meeting of the Bamboo Development Board)

✒️नागपूर(Nagpur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

नागपूर (दि.27 ऑगस्ट) :- बांबू हा पर्यावरणरक्षक असून, बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता असल्याने राज्यात बांबू उत्पादन वाढीला प्रोत्साहन, त्यापासून तयार होणाऱ्या आकर्षक वस्तू, हस्तकला आणि फर्निचर ला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी बांबू विकास मंडळाने नियोजन करावे आणि यासंदर्भात जागृती निर्माण करण्यासाठी तातडीने नियोजन करावे अशा सूचना राज्याचे वने सांस्कृतिक कार्ये आणि मत्स्यव्यवसाय मंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी आज दिल्या.

बांबू विकास मंडळाच्या बैठकीत ना मुनगंटीवार यांनी मंडळाच्या वाटचालीचा सविस्तर आढावा घेत महत्वाच्या सूचना केल्या. महाराष्ट्र बांबू विकास मंडळाचे व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवास राव यावेळी उपस्थित होते. तत्पूर्वी महाराष्ट्र बांबू विकास मंडळाच्या आवारातील बांबू ऊती संवर्धन (टिश्यू कल्चर) केंद्राचे उदघाटन ना. मुनगंटीवार यांनी केले.

मंडळाच्या बैठकीत श्री. राव यांनी प्रथम मंडळाच्या कार्यपध्दतीसंदर्भात सादरीकरण केले. ना. मुनगंटीवार यावेळी म्हणाले की, बांबू लागवडी संदर्भात लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची आपली जबाबदारी आहे. शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न देणारे पिक म्हणून विश्वास देवून प्रत्येक जिल्ह्यात बांबूपासून तयार होणाऱ्या वस्तूंचे प्रशिक्षण व उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने वन विभाग पुढाकार घेईल असेही त्यांनी सांगितले. 

ते म्हणाले, बांबूपासून तयार वस्तूंना मुंबईसारख्या शहरात आणि विदेशातदेखिल मागणी आहे; मंडळाने यासाठी तज्ञ आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या विद्याविशारद (आर्किटेक्ट), डिजाइनर यांची मदत घेवून नवीनतम गोष्टी बनवून योग्य विपणन व्यवस्थेला(मार्केटिंग) बळ देण्याची गरज असल्याचे ना. मुनगंटीवार म्हणाले.

पर्यावरणपूरक इंधन म्हणून बाबू ला मागणी आहे. जैविक इंधन वापराकडे मोठमोठ्या उद्योगांचा कल आहे; त्यासाठी शेतकरी उत्पादक कंपन्याना (फार्मर प्रोड्यूसर्स कंपनी ) एकत्र करुन उद्योग क्षेत्रातील नामांकित कारखान्यात बांबू पॅलेट देता येतील का याचा अभ्यास करुन त्या दृष्टीने काम करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. 

 बांबूचे आजच्या घडीला किमान १५०० मुख्य उपयोग आहेत. बांबू उत्पादक देशांपैकी भारतात याचे क्षेत्र सर्वांत जास्त आहे. उत्पन्नात मात्र इतर देश आघाडीवर आहेत, हे आपल्याला बदलवायचे आहे . सर्व सरकारी परवानग्यांच्या कचाट्यातून मुक्त झालेले बांबू एक औद्योगिक पीक म्हणून पुढे येत आहे. बांबू हे व्यापारी पीक असल्याने त्यापासून बनवलेल्या वस्तूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात चांगली मागणी असते.

बांबू हा जगभरातील अविकसित, अर्धविकसित व विकसित देशांतील जनतेचा जीवनाधार आहे. बांबू हा पर्यावरणरक्षक तर आहेच, याचबरोबरीने बांबू उद्योगात असंख्य लोकांना रोजगार देण्याची क्षमता आहे. पडवीच्या आधारापासून ते कागदनिर्मितीपर्यंत सर्व उद्योग येतात.त्यामुळे बांबू प्रक्रिया उद्योगाला चालना देण्यासाठी आपल्याला काम करायचे आहे असेही ना. मुनगंटीवार म्हणाले. 

राज्यातील बुरड समाजाकडे कला आहे, विविध वस्तू हा समाज बनवतो, या समाजाच्या विकासाकरिता व सक्षम करण्यासाठी आधुनिक पद्धतीने त्यांची कला विकसित व्हावी असा मानस असून यासाठी प्रशिक्षण कार्यशाळा घेण्याच्या सूचनाही ना. मुनगंटीवार यांनी बैठकीत दिल्या.