✒️शिरीष उगे वरोरा (Warora प्रतिनिधी)
वरोरा (दि.7 जून) :- धनगर समाज आतापर्यंत आपल्या मुलभुत गरजांसाठी सातत्याने संघर्ष करीत आला आहे पण त्याने आता पुढील संघर्ष हा सत्तेत जाण्यासाठी करावा .
अहिल्यादेवी होळकर यांनी दिलेला धर्म आणि मानवसेवेचा विचार समोर ठेवून या समाजाने वाटचाल करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन समाजसेविका सोनुबाई येवले यांनी केले पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 298 व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून निवृत्त मुख्याध्यापक अशोकराव वैद्य, डॉ.प्रफुल्ल खुजे, वैद्यकीय अधिकारी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा, कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अॅड. अनिल कुमार ढोले , अध्यक्ष धनगर अधिकारी व कर्मचारी संघ महाराष्ट्र राज्य, सौ वंदना बर्डे ,मुंगल खराबे , विलास भाऊ झीले, संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती, वरोरा हे उपस्थित होते.
आपल्या आश्रमाच्या निर्मितीच्या संघर्षाची कहाणी विशद करित्या म्हणाल्या की, धनगर समाजाने संघटीत होऊन आपले प्रतिनिधित्व अधोरेखित केले पाहिजे.यावेळी त्यांनी आश्रमात अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बांधण्याचा संकल्प सोडला.
खासदार बाळूभाऊ धानोरकर यांच्या निधनामुळे 31 मे रोजी होणारा हा कार्यक्रम 3 जून रोजी घेण्यात आला.यावेळी समाजातील विविध क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी आणि समाज बांधवांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.मंचावर उपस्थित मान्यवरांनी समयोचित मार्गदर्शन केले.
यावेळी राजश्री वैद्य या तरुणीच्या अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर दिलेल्या आवेशपूर्ण भाषणामुळे श्रोते मंत्रमुग्ध झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक अॅड. अनिल कुमार ढोले, अध्यक्ष धनगर अधिकारी व कर्मचारी संघ महाराष्ट्र यांनी समाजातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी समाजाप्रति भान ठेवून सामाजिक ऋण म्हणून समाजातील तरुण-तरुणींना योग्य मार्गदर्शन केले पाहिजे व समाज एक संघ ठेवून प्रगतीपथावर नेण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाची सुरुवात अहिल्यादेवी होळकर, गाडगे महाराज , डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण आणि दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाचे संचालन सौ संगीता बोधे (तुराळे) यांनी, प्रास्ताविक इंजिनियर आशिष मोंडे यांनी तर आभार प्रदर्शन इंजिनीयर गणेश चिडे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अहिल्यादेवी होळकर उत्सव समितीच्या सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.
