जिल्ह्याचा भुजल व्यवस्थापन आराखडा जिल्हाधिका-यांना सादर     Ground water management plan of the district submitted to the collector

✒️चंद्रपूर(Chandrapur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)  

चंद्रपूर (दि. 19 एप्रिल) : –

            केंद्रीय भुमी जलबोर्डाच्या वतीने चंद्रपूर जिल्ह्याचा भुजल व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. सदर आराखडा बोर्डच्या अधिका-यांनी जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांना नुकताच सादर केला. यावेळी भुमी जलबोर्डचे वैज्ञानिक अभय निवसरकार, निर्मल कुमार नंदा आणि व्यंकटेसम बी. तसेच जि.प. प्रभारी जिल्हा जलसंधारण अधिकारी प्रियंका रायपुरे आदी उपस्थित होते. 

केंद्र सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत येणा-या केंद्रीय भुमी जल बोर्ड, जल संसाधन, नदी विकास व गंगा संरक्षण विभागाने चंद्रपूर जिल्ह्याचा भुजल व्यवस्थापन आराखडा तयार केला आहे. यात जिल्ह्याचे पर्जन्यमान, मान्सुनपूर्व व नंतरची पाणी पातळी, भुगर्भातील पाणी पातळीत वाढ अथवा घट, जिल्ह्यातील भुगर्भस्थिती, माती व जमिनीचा वापर, कृषी उत्पादन क्षमता, वॉटल टेबल, भुगर्भीय खडक, भुजल स्त्रोत, संसाधनांची उपलब्धता व वापर, पाण्याची उपलब्धता, मागणी व वापर आदींचा सखोल अभ्यास करून हा आराखडा तयार करण्यात आला आहे.

वैज्ञानिक निर्मल कुमार नंदा यांनी अहवालाचे सादरीकरण तसेच बोर्डच्या अधिका-यांनी जिल्ह्याच्या भुजल व्यवस्थापनाबाबत जिल्हाधिका-यांशी चर्चा केली. भुजल आराखड्यात सुचविलेल्या बाबींवर योग्य अंमलबजावणी करण्याच्या सुचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी पाणी पुरवठा व जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.