🔹सरकारने विद्यार्थ्याना सरसकट एसटी प्रवासात सूट द्यावी, मनसेची मागणी
✒️वरोरा(विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
चंद्रपूर (दि.19 एप्रिल) :-
महाराष्ट्र सरकारने पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता मतांच्या राजकारणासाठी एसटी प्रवास करणाऱ्या महिलांसाठी पन्नास टक्के सूट देण्याची घोषणा केली आहे.
अर्थात याचा फायदा ग्रामीण महिलांना कमी आणि कर्मचारी महिलांना जास्तं होतं आहे आणि त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात काळी पिवळी टॅक्सी व ऑटो रिक्षा चालक मालक यांना प्रवाशी मिळत नसल्याने बैंक कर्ज काढून विकत घेतलेल्या वाहनांचे कर्ज कसे फेडायचे व जीवन जगण्यासाठी घर संसाराला पैसे कसे लावायचे हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला असून त्यांच्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.
त्यामुळे राज्य शासनाने महिलांना दिलेली पन्नास टक्के प्रवास सवलत रद्द करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्याना शाळेत व महाविद्यालयीन शिक्षणासाठी शहरात जावे लागते त्यांना एसटी बस मधे सरसकट मोफत प्रवासांची सूट द्यावी अशी मागणी वरोरा तहसील कार्यालयावर निघालेल्या ऑटो रिक्षा काळी पिवळी टॅक्सी चालक मालक मोर्चा प्रसंगी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना तहसीलदार यांच्या मार्फत दिलेल्या निवेदनातून केली आहे.
कुठलाही निर्णय घेताना जनतेच्या मनात काय आहे व जनतेला कसा याचा फायदा होईल याबद्दल विधानसभा सभागृहात चर्चा व्हायला हवी व त्याबद्दल सर्वेक्षण व्हायला हवे मात्र येणाऱ्या निवडणुकांमधे आपल्या पक्षाला सत्तेत येण्यासाठी फायदा व्हावा यासाठी महिलांना एसटी प्रवासात पन्नास टक्के सूट सारखे निर्णय घेतल्या जाते ते चुकीचे असून मुळात शालेय विद्यार्थ्यांना एसटी प्रवासात सरसकट सूट मिळणे हा जनहिताचा निर्णय आहे.
त्यामुळे सरकारने महिलांना एसटी प्रवासात दिलेली सूट रद्द करावी व ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक उज्वल भविष्यासाठी त्यांना एसटी प्रवासात सरसकट सूट देण्यात यावी अन्यथा या विषयाला घेऊन आम्ही सर्व ऑटो टॅक्सी व काळी पिवळी चालक मालक यांच्या हक्कांसाठी व त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी मुंबई मंत्रालयासमोर आंदोलन करू असा इशारा मनसे तर्फे निवेदनाच्या माध्यमातून देण्यात आला.
यावेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष राजू कुकडे, जिल्हा सचिव विनोद सोनटक्के, विशाल देठे, गजू वादाफळे,सूरज मानकर, प्रतीक मुडे, राजेंद्र धाबेकर, उत्तम चिंचोलकर, लक्ष्मीकांत थेरे, हाफिज पठाण. कलीम शेख, मधु खारकर, महादेव गुजरकर व असंख्य ऑटो रिक्षा काळी पिवळी चालक मालक संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते.
