लग्न आणि दारिद्र्याचा संबंध? Relationship between marriage and poverty?

283

✒️ चिमूर (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर (दि.22 मार्च) :- आपली लढाई दारीद्रयाच्या विरोधात आहे म्हटल्यावर आपल्याला वाटते की, ती आर्थिक समस्या आहे. आपल्याला असे वाटते काय की पैसा दिल्यावर एखाद्याची गरिबी नष्ट होवू शकते?

गरीब लोकांना लाखो रुपयाची मदत केली तरी त्यांचे दारिद्र्य जाणार नाही, हे आपण लक्षात घेतले पाहिजे. दारिद्र्य ही समस्या आर्थिक असती तर तिला सोडवता आले असते, पण ती आर्थिक नसल्याने तिला सोडवता येत नाही. दारिद्र्य विषयक समस्या आर्थिक नसल्याने वाचून तुम्हाला आश्चर्यही वाटेल.

दारिद्र्याचा आणि आपल्याला असणाऱ्या सवईचा जवळचा संबंध आहे. आपण अशा काही प्रथा-परंपरा पाळतो, अशा काही कल्पना आपल्या डोक्यात आहेत, त्याच आपल्याला दारिद्र्यात ठेवतात, अधिक दरिद्र करतात.

आपण ग्रामीण समूहाचे अंगानं विचार करतोय, म्हणजे ग्रामीण गरिबांच्या बाबतीत विचार करीत आहेत. श्रीमंत माणूस लग्न कसा करतो, हा आपला विषय नाही, त्यांचाकडे अतिरिक्त पैसा असतो, म्हणून तो मनसोक्त उधळतो. त्यांचं आपण समजू शकतो.

          आपण जर स्वतःला गरीब समजू असू. गरीब असू तर आपण लग्नाच्या बाबतीत श्रीमंतांची नक्कल करण्याची गरज नाही. आपण मोठ्या थाटामाटात जरी लग्न केलं तरी गावकरी आपल्याला श्रीमंत माणूस समजणारच नाही. त्यांचा दृष्टीने दोन गोष्टी झालेल्या असतात. (१) गरीब असून थाटामाटात लग्न केलं. (२) थाटामाटात लग्न करून आपण कर्ज बाजरी झालेले असतो. आपण जर गरीबच आहो तर गरिबांचा पद्धतीने, साध्या पद्धतीने, कमी खर्चात, कर्ज न काढता लग्न करता येऊ शकतं.

लग्न थाटामाटात केले पाहिजे असे कोणी सांगितले आपल्याला? आपली गरीबी जर गावात जगजाहीर असेल तर साध्या पध्दतीने, कमी खर्चात केलेले लग्न गावकरी समजू शकतात. उगीच खोटा मोठेपणा अंगात आणून थाटामाटाचा लग्नाने आपल्याला कर्जाचा-दारिद्र्याचा खाईत ढकलेले असते.

मुळात लग्न म्हणजे असा एक सोहळा असतो, ज्यात एका विवाहयोग्य स्त्रीला आणि पुरुषाला लग्न या नावाखाली लैंगिक संबंध ठेवण्यासाठी समाजाने परवानगी द्यावी किंवा समाजासमक्ष अमक्याची मुलगी आणि तमक्याचा मुलगा विवाहबद्ध होत आहे, हे माहीत करून देणे. त्यासाठी केवळ दोन पुष्पहार महत्त्वाचे आहे. दोघांनी एकमेकांचा स्वीकार केला आहे, म्हणून एकमेकांचा गळ्यात पुष्पहार घालणे आणि उपस्थितांनी टाळ्या वाजवणे, इतके केले तरी पुरेसे आहे.

ग्रामीण भागात आजही कमी वयात लग्न करण्याचे प्रमाण कमी झालेले नाही. लग्न म्हणजे काय? नवरा म्हणजे काय? बायको म्हणजे काय? समजण्या पूर्वीच लग्न झाल्यावर अशा मुलानं अथवा मुलीनं काय करायचं? कमी वयात आलेले मातृत्व अथवा पीतृत्व कस जपायचं.

इतक्या कमी वयात लग्न करायला कोण लावत? आणि कश्यासाठी केलं जातं कमी वयात लग्न? जे कर्ज पाच वर्षांनंतर आपण करून घेणार आहोत, ते आजच करून घ्यायच? कर्जबाजारी होण्याइतकी घाई आपल्याला का झालेली असते? अकाली म्हतारं होण्याची घाई आपल्याला का झालली असते? 

वयाचा १४ व्या १५ व्या वर्षी मुलीच लग्न न करता १८ वर्षा (आता नवीन कायद्यानुसार 21 वर्षे) नंतर जर केले तर येणाऱ्या तीन चार वर्षात पैशाची तडजोड करता येईल, ज्यामुळे योग्य वयात मुलीच लग्न होईल आणि लग्नासाठी कर्ज पण होणार नाही.

एक कोटी रुपये खर्च करून केलेल्या लग्नलाही लग्नच म्हणतात आणि एक हजार रुपये खर्च केलेल्या लग्नालाही लग्नच म्हणतात, मग विनाकारण लाखाचे कर्ज काढून लग्न करणे आणि नंतर आयुष्य भर कर्ज फेडत, कुढत- कण्हत जगणे कोणी सांगितले? पण आपल्या डोक्यातील जुनाट कल्पना आणि अलीकडचा काळातील भांडवली कल्पना आपल्याला अस काहीही करून देत नाहीत, याचा दुसरा अर्थ अशा की आपल्या डोक्यातील जुनाट कल्पना आपल्याला आनंदानं जगु देत नाहीत. कर्ज बाजारी झालेला माणूस आनंदानं कस जगू शकतो?

पण आपल्याला जर आनंदानं जगायचं असेल तर ज्या गोष्टींने आनंदानं जगता येईल त्याच गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आपला जोर जगण्यावर असला पाहिजे लग्नावर नाही.

▪️आहेर- लग्नामधीलच हा एक उपप्रकार आहे. आपण ज्याचा लग्नाला जात आहोत, त्या वधूला किंवा वराला आपण देण्यासाठी काहीतरी घेवून जात असतो. त्याला लग्नाच्या भाषेत आहेर आणि आधुनिक भाषेत गिफ़्ट असे म्हणतात.

एका लग्नाला किमान शंभर माणसे आलेली आहेत असे आपण समजू. एक- ती एका दिवसाचा रोजगार बुडवून ती आलेली असतात. दोन- लग्नापर्यंत येण्यासाठी त्यांचे काही रक्कम खर्च केलेली असते.

वरील एक, दोन आणि तीन वाक्यातून आपण पाहतोय की, त्या शंभर लोकांचे नुकसानच झालेले आहे. ही झाली एका लग्नाची गोष्ट.अशा दहा लग्नाला जरी एका कुटूंबाने हजेरी लावली तरी एका कुटूंबाचे किती हजाराचे नुकसान होते. याचा अंदाज आपल्याला लावता येईल.

इतक्या मूर्खपणाचा गोष्टी ज्या समाजात घडतात, हे सगळं जो समाज करतो, तो कायमस्वरूपी दारिद्र्यात राहणार नाही कशावरून? आपलं दारिद्र्य मूळ कारणाने असू शकत, त्याच वेगळं कारणही असू शकत, पण आपण कायम दारिद्र्यात रहातो ते अशा मूर्खपणाचा अनेक गोष्टीमुळे. मग या गोष्टी आपल्या समाजात, गावा- गावात घडत असतील तर आनंदानं जगण्याचा आपण विचार तरी करू शकतो का? आनंदानं जणू जगताच येवू नाही; अशी व्यवस्थाच आपण करून ठेवली आहे.

या बद्दल लोकांना बोलले तर म्हणतात, लोकांकडून घेतलेले असते, त्यामुळे पुन्हा परत द्यावे लागते. बरोबर आहे. आपण लग्न करतो त्यामुळे शंभर लोकांकडील आहेर/गिफ्ट हसत-हसत घेतलेले असते, मग रडत-रडत का होईना त्या शंभर लोकांना त्याची परतफेड करणे गरजेचेच असते.

पण आपण एका गोष्टीचा विचार करीत नाही, शंभर लोकांचे घेणे आणि शंभर लोकांना देणे, हा एकच प्रकार असेल तर तो करायचाच कशाला?

लग्न झालेल्या जोडप्याला किती वस्तूची, किती भांड्याची गरज असते?अगदीच थोड्या. मग घरात बसणार नाहीत इतकी भांडी कशासाठी गोळा करून ठेवायची?

तर ह्या आहेत आपल्याला लागलेल्या वाईट सवयी. त्या व्यसनी माणसासारखेच आपले झाले आहे. मग आपले दारिद्र्य कसे जाईल?आपले कर्ज कसे फिटेल? आपल्याला आनंदानं तरी कसं जगता येईल? या सगळ्या गोष्टीपेक्षा आपलं आनंदानं जगणं जास्त महत्वाच आहे. या जगात आपण आपलं घर भांड्याने भरून ठेवण्यासाठी आलेलो नाहीत. या जगात आपण जीवनाचा आनंद घेण्यासाठी आलो आहोत, म्हणून आपण जीवनाकडे वळले पाहिजे. अशाप्रकारच्या प्रथा बंद केल्या पाहिजेत.

शब्दांकन- सुरेश डांगे, संपादक-साप्ताहिक पुरोगामी संदेश मो. 8605592830