खेमजई ग्रामपंचायतचा अभिनव निर्णय

🔹झेंडा वंदनाचा मान सरपंच ऐवजी दहावी बारावीमध्ये उच्च गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला

✒️ वरोरा (विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

 वरोरा ( दि.29 जानेवारी ) :-  तालुक्यातील नाविन्यपूर्ण उपक्रमासाठी ओळखले जाणारे खेमजई गाव ! या ग्रामपंचायतीने स्वातंत्र्य दिन व गणराज्य दिनानिमित्त होत असलेल्या झेंडावंदनाचा मान गावातील वर्ग १० व १२ मध्ये उच्चतम गुण घेणाऱ्या विद्यार्थ्याला देण्याचा निर्णय घेऊन नुकताच झालेल्या प्रजासत्ताक दिनी अंमल केला आहे.

२६ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या प्रजासत्ताक दिनाचा ध्वजारोहण नम्रता राहुल गायकवाड या विद्यार्थिनीने केले. सदर विद्यार्थिनीने ९३ टक्के गुण घेऊन दहावीची परीक्षा पास केली करून गावातील सर्वोत्तम गुण घेण्याचा मान मिळवलेला होता.

        ग्रामपंचायतीच्या वतीने सरपंच यांचे हस्ते ध्वजारोहणाचा कार्यक्रम केला जातो मात्र खेमजई ग्रामपंचायतीने दिनांक ११ जानेवारी २०२३ रोजी झालेल्या मासिक सभेत गावातील विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक स्पर्धा निर्माण व्हावी या हेतूने झेंडावंदनाची ऑफर गावातील विद्यार्थ्यांना बहाल केली. प्रजासत्ताक दिनी झालेल्या कार्यक्रमात सदर विद्यार्थिनीला गरीब परिस्थितीत चांगले गुण प्राप्त केले त्याबद्दल ग्रामपंचायतीने पाच हजार रुपयाचे बक्षीस सुद्धा दिलेले आहेत. 

सदर संकल्पना सरपंच मनीषा वसंता चौधरी यांनी मांडली असून या संकल्पनेला सर्व सदस्यांनी सहमती दर्शवीत झेंडावंदनाचा मान विद्यार्थ्यांना देण्याचा अभिनव निर्णय पारित केला. ग्रामपंचायतीने घेतलेल्या निर्णयाचे गावकरी व सर्वत्र कौतुक केले जात आहे.