साहेबराव कांबळे यांची एमएलसी निवडणुकीकडे वाटचाल

🔸काँग्रेस कार्यकर्त्यांत उत्साहाचे वातावरण

✒️विश्वनाथ महामुने महागाव (Mahagaon विभागीय प्रतिनिधी)

महागाव(दि.3 मे) :-

उमरखेड -महागांव विधानसभा मतदारसंघात अतिशय चुरशीच्या लढतीत अल्पमताने पराभव स्वीकारावा लागलेले काँग्रेसचे नेते साहेबराव कांबळे आता यवतमाळ जिल्हा एमएलसी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सक्रिय होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून उमेदवारीसाठी त्यांचे नाव आघाडीवर असल्याचे सूत्रांकडून समजते. त्यांच्या संभाव्य उमेदवारीमुळे स्थानिक काँग्रेसमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. 

उमरखेड – महागांव विधानसभा निवडणुकीत साहेबराव कांबळे यांनी प्रचंड प्रचार करत मतदारांशी थेट संपर्क साधला होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत लढत रंगली होती आणि आत्यअल्प फरकाने त्यांना पराभव पत्करावा लागला. त्या नंतरही त्यांनी मतदार संघात जनसंपर्क टिकून ठेवला. त्यामुळे त्यांच्या कार्यशैलीवर समाधानी असलेल्या कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा साहेबराव कांबळे यांना संधी मिळावी अशी मागणी केली आहे. सध्याच्या राजकीय परिस्थितीत मतदार संघात काँग्रेसची ताकद काहीशी कमी झाल्याचे चित्र असले तरी कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संघटनात्मक बळ वाढू शकते असा विश्वास व्यक्त केला जात आहे. स्थानिक पातळीवर त्यांनी अनेक सामाजिक प्रश्नावर आवाज उठवला असून शेतकरी कामगार आणि वंचित घटका साठी ते सातत्याने काम करत असल्याची प्रतिमा त्यांनी निर्माण केली आहे. कांबळे यांची ओळख गोरगरीब जनतेच्या नेत्याप्रमाणे आहे. त्यांच्या निवासस्थानी दररोज नागरिकांच्या समस्या मांडण्या साठी मोठी गर्दी होत असल्याची दिसून येते. विविध राजकीय कामे, सामाजिक अडचणी तसेच वैयक्तिक प्रश्न घेऊन येणाऱ्या नागरिकांना ते मार्गदर्शन करत असल्याने त्यांचा जनसंपर्क मजबूत झाला आहे. त्यामुळे ग्रामीण भागात त्यांची लोकप्रियता टिकून आहे.

एमएलसी निवडणूक ही स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रतिनिधीच्या मतावर आधारित असल्याने संघटनात्मक ताकद आणि संपर्क याला विशेष महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर कांबळे यांच्या व्यापक जनसंपर्काने कार्यकर्त्यांशी असलेला जवळचा संबंध त्यांना फायदेशीर ठरू शकतो, असे राजकीय जानकाराचे मत आहे. काँग्रेस कडून अधिकृत उमेदवारी जाहीर होणे बाकी असले तरी साहेबराव कांबळे यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. जर त्यांना उमेदवारी मिळाली तर त्यांचा अनुभव, जनाधार आणि कार्यकर्त्यांच्या पाठिंब्याच्या जोरावर ते निश्चित विजय मिळवू शकतील असा विश्वास काँग्रेस कार्यकर्त्याकडून व्यक्त केल्या जात आहे. यामुळे आगामी यवतमाळ जिल्हा एमएलसी निवडणूक अधिक रंगदार होण्याची शक्यता असून काँग्रेसच्या राजकीय पुनर्जीवनासाठी ही निवडणूक महत्त्वाची ठरणार असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.