✒️वरोरा(Warora विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)
वरोरा (दि.30 मार्च) :- तालुक्यातील सूमठाणा येथील विनोद शत्रुघ्न दडमल ४२ वर्ष या शेतकऱ्याने बुधवार दि.२६ मार्च रोजी विष प्राशन केले होते. उपचारादरम्यान गुरुवार दि.२७ मार्च रोजी पहाटे ३ वाजताच्या सुमारास चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याचा मृत्यू झाला. कर्जबाजारीपणातून त्याने आत्महत्या केल्याचे म्हटले जाते.
वरोरा तालुक्यातील सुमठाणा येथील शत्रुघ्न दडमल यांना विनोद आणि प्रमोद अशी दोन मुले आहे. वृद्धावस्थेमुळे शत्रुघ्न दडमल यांच्याकडे असलेल्या पाच एकर शेती पैकी अडीच एकर प्रमोद व अडीच एकर विनोद यांना वाहिती करिता विभागणी करून दिली होती. विनोद वाट्याला आलेल्या अडीच एकर शेतीमधील उत्पन्नावर आपला व आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु गेल्या काही वर्षापासून त्याला या शेतीतून फारसे उत्पन्न होत नव्हते. तसेच जंगल व तलावा लगत असलेल्या या शेतीमध्ये वन्य प्राण्यांच्या हौदोसाने देखील शेतपीकाचे अतोनात नुकसान झाले होते. प्रत्येक वर्षी वडील पीक कर्ज काढून दोन्ही भावांमध्ये समान वाटप करीत होते. त्यांनी या वर्षीच्या हंगामात १ लाख ६५ हजार रुपये पीक कर्ज उचलले होते.
यापैकी अर्धी रक्कम विनोद ला व अर्धी रक्कम प्रमोद ला त्यांनी दिली होती. ३१ मार्चपूर्वी पीक कर्ज भरायचे असताना विनोद कडे पीक कर्ज भरण्याकरिता रक्कम जमा होऊ शकली नाही. नापिकी व कर्ज यामुळे तो गेल्या काही दिवसांपासून आर्थिक विवंचनेत होता. याच दरम्यान बुधवार दि.२६ मार्च रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घरी कोणीही नसल्याची संधी साधून त्याने विष प्राशन केले. ही माहिती होताच नातेवाईकांनी त्याला वरोरा उपजिल्हा रुग्णालयात उपचारा करिता दाखल केले. प्रकृती चिंताजनक असल्याने चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात त्याला पाठविण्यात आले.
परंतु गुरुवार दि. २७ मार्च रोजी पहाटे तीन वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान त्याचे निधन झाले. त्याच्यामागे आई-वडील ,एक मुलगा व पत्नी असा परिवार आहे. घरचा करता तरुण पुरुष गमावल्याने कुटुंबावर दुःखाचे आभाळ कोसळले आहे. विनोदच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नसले तरी कर्जबाजारीपणातून त्याने आत्महत्या केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. घटनेचा तपास शेगाव (बु) पोलीस करीत आहे.