क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त आदरांजली

✒️चिमूर(Chimur विदर्भ प्रतिष्ठा न्यूज नेटवर्क)

चिमूर(दि .1 डिसेंबर) :- तालुक्यातील जेतवन बुद्ध विहार, मालेवाडा येथे दि.28 नोंव्हेबर 2023 रोजी सकाळी ठीक 9.30 वाजता क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले स्मृतिदिनानिमित्त आदरांजली कार्यक्रम संपन्न झाला.

             आयु. दुर्योधन गजभिये व आयु. जगदीश रामटेके यांचे हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीपप्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले.

              मार्गदर्शन करतांना मान्यवर म्हणाले की, त्याकाळी सामाजिक असमानता आणि इतर अनेक जाचक बंधने स्रीयांवर घातली गेली होती. त्यांना शिक्षणापासून वंचित ठेवले जायचे. त्याकाळी बालविवाह,सतीची प्रथा यासारख्या अनिष्ट चालीरीती परंपरा यामुळे स्रियांना समाजात दुय्यम वागणूक मिळायची. या विरोधात महात्मा ज्योतिबा फुले यांनी आवाज उठवला आणि त्यांना न्याय मिळवून देण्याचे महान कार्य केले. सामाजिक विषमता, अशिक्षितपणा, जुलमी राजवट इत्यादी.

अनेक प्रतिकूल परिस्थितीतून जात असताना देखील त्यावेळी त्यांनी दूरदृष्टीने खूप प्रगल्भ असे विचार समाजासमोर मांडले. सत्यशोधक समाज संस्था स्थापन करून त्यांनी समाज सुधारण्याचे व स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवण्याचे काम महात्मा ज्योतिबा फुले यांनी केले. “मानवाचा एकच धर्म असावा सत्याने वर्तावा, ज्योती म्हणे.” अशा शब्दात मान्यवर आयु. दुर्योधन गजभिये , आयु.जगदीश रामटेके व आयु. आशिक रामटेके यांनी मार्गदर्शन करून अभिवादन केले. सामाजिक कार्यातील निरंतर सहकार्याबद्दल कु. तृप्ती ठवरे यांचा सत्कार करून भेटवस्तू देण्यात आली.

         या प्रसंगी राजेंद्र गजभिये, भीमाबाई गजभिये, तृप्ती ठवरे, लक्ष्मी नरुले, वैष्णवी वरखडे,परी चव्हाण,आणि शालेय विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन आयु. योगेश मेश्राम यांनी केले. तर आभार प्रदर्शन प्रदीप मेश्राम यांनी केले.