कोविडने मयत झालेल्या कर्जदारांच्या विधवांना व वारसदारांना कर्जमुक्त करा .रवींद्र शिंदे

962

✒️मनोज कसारे (भद्रावती प्रतिनिधी)

भद्रावती (दि.15 फेब्रुवारी) :- कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मयत झालेल्या कर्जदाराच्या कर्जफेडीची जवाबदारी संबंधित विधवा महिलेवर व व वारसदारांवर आहे. त्यामुळे कोविडने मयत झालेल्या कर्जदारांच्या विधवांवरील कर्ज माफ करून त्यांना कर्जमुक्त करा, अशी मागणी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) वरोरा भद्रावती विधानसभा अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी केलेली आहे.

घराचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. व्यवस्थित सुरू असलेला संसार अस्तव्यस्त होतो. नियमित असलेली मिळकत बंद पडते. याचा परिणाम घरातील इतर सदस्यांवर होतो. कुटुंबाची आर्थिक घडी बिघडते. परिणामी पतीने घेतलेल्या कर्जफेडीची संपूर्ण जबाबदारी ही कुटुंबातील महिलेवर व वारसदारांवर येते. कर्जावरील व्याज वाढत राहते व कर्जाचे हफ्ते थकीत होतात. कोविड ही एक मानवावर आलेली आपत्ती होती. ती महामारीची परिस्थिती अनेकांचे संसार उद्ध्वस्त करून गेली. या सर्वांचा गांभीर्याने विचार करून राज्य सरकारने कोविड-१९ विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मयत झालेल्या कर्जदाराचे कर्ज माफ करावे. व कोविडच्या प्रभावाने विधवा झालेल्या महिलांना तथा वारसदारांना कर्जमुक्त करावे, अशी मागणी आहे.

कोरोना प्रादुर्भावाचा काळ संपून बराच कालावधी झाला आहे. म्हणून राज्य सरकारने त्वरित माहिती संकलित करावी व कर्ज बाधित विधवांना व वारसदारांना दिलासा द्यावा. सोबतच अद्यापपावेतो नियमित पीक कर्जाचा भरणा केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर सानुग्रह अनुदान जमा झालेला नाही. त्यामुळे नियमित पीक कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ सानुग्रह अनुदान जमा करावे, अशीही मागणी रवींद्र शिंदे यांनी केलेली आहे.